www.24taas.com, मुंबई
`माणसांना जगवायचं कसं हा सर्वात मोठा प्रश्न आहे… यंदाचा दुष्काळ गंभीर आणि झोप उडणारा’ असल्याचं भीषण वास्तव केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी मांडलंय. राष्ट्रवादीच्या मुंबईतल्या हायटेक कार्यालयाच्या उदघाटन सोहळ्यात ते बोलत होते.
आगामी काळात अशीच परिस्थिती राहिल्यास राज्याचं काही खरं नाही, अशी भीती पवारांनी व्यक्त केलीय. सर्वात भीषण परिस्थिती नाशिक, पुणे आणि औरंगाबाद जिल्ह्याची असल्याचंही त्यांनी नमूद केलंय. दुष्काळग्रस्त भागातल्या विद्यार्थ्यांची फी माफ करण्याच्या सूचना त्यांनी राज्य सरकारला दिल्या आहेत. दुष्काळग्रस्त भागासाठी ७७८ कोटी रुपये देण्याची शिफारस केंद्राला केली असल्याची माहिती पवारांनी यावेळी दिलीय.
राज्यात अन्नधान्याची कमतरता नसली तरी, पाण्याच्या दुर्भिक्ष्याअभावी स्थिती खूपच गंभीर असल्याचं शरद पवार यांनी सांगितलं. जायकवाडी, उजनी या मोठ्या धरणांनी तळ गाठल्याचं सांगून त्यांनी राज्य सरकारला सर्वप्रथम पिण्याच्या पाण्याचा प्रश्न युद्धपातळीवर हाताळण्याची सूचना केली. राष्ट्रवादीच्या सर्व पालकमंत्र्यांनी आपापल्या जिल्ह्यात जाऊन, कामाला सुरूवात करण्याचे आदेशही त्यांनी दिले. उपलब्ध पाण्याचं व्यवस्थित नियोजन करताना पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.
दुष्काळावर उपाययोजनांसाठी पालकमंत्री आणि संपर्कमंत्र्यांना जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात बैठक घेण्याच्या सूचनाही पवारांना दिल्यात.