राहुल नार्वेकर करणार अखेरचा जय महाराष्ट्र?

शिवसेनेच्या राहुल नार्वेकरांनी माघार घेतल्यामुळं विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध झाली आहे. मात्र, नार्वेकर यांनी शिवसेनेला जोरदार दे धक्का दिलाय. त्यांनी सेनेला जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादीची वाट धरली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेनेचे शिवबंधन धागा तुटला आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 14, 2014, 07:25 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
शिवसेनेच्या राहुल नार्वेकरांनी माघार घेतल्यामुळं विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध झाली आहे. मात्र, नार्वेकर यांनी शिवसेनेला जोरदार दे धक्का देण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेनेचे शिवबंधन धागा तुटण्यीची शक्यता आहे.
दरम्यान, राहुल नार्वेकर यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याचे साधे शिवसेनेला कळविलेले नाही. या निर्णयापासून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अनभिज्ञ असल्याचं चित्र आहे. येत्या २० मार्च रोजी निवडणूक पार पडणार आहे. `मातोश्री`वर पत्रकार परिषद घेणाऱ्या उद्धव ठाकरेंना याची कोणतीही कल्पना नव्हती. विधान परिषदेबाबत विचारला असता तीन वाजता निर्णय घेण्यात येईल, असं उत्तर उद्धव ठाकरेंनी दिलं. त्यामुळे नार्वेकरांच्या निर्णयापासून उद्धव पूर्णपणे अनभिज्ञ असल्याचं दिसून आलं आहे.
निवडणुकीच्या रिंगणात ९ उमेदवार राहिल्यानं निवडणूक बिनविरोध झाली आहे. विधान परिषदेच्या नऊ जागा रिक्त झाल्या होत्या. मात्र यासाठी १० जणांचे अर्ज आल्यामुळं निवडणूक होणार होती. आता राहुल नार्वेकर यांनी माघार घेतल्यामुळं निवडणून बिनविरोध झाली असून घोडबाजारालाही चाप बसला आहे. मात्र, नार्वेकर नाराज असल्याने ते सेनेला रामराम करण्याची शक्यता आहे.
या निवडणुकीसाठी भाजप नेत्यांनी राज ठाकरेंच्या `कृष्णकुंज`चे उंबरठे झिजवले होते. मात्र शिवसेनेच्या उमेदवारानं माघार घेतल्यानं भाजपच्या नेत्यांचे श्रम वाया गेले अशी चर्चा रंगलीय. त्यातच नार्वेकरांनी शिवसेनेचे साथ सोडण्याची शक्यता असल्याने सेनेला हा जोरदार धक्का आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.