मुंबई: मुंबई लोकल रेल्वेचे महिला डबे महिलांसाठी डोकेदुखी ठरणारी जागा ठरलीय. विशेषतः मध्य रेल्वेवरच्या गाड्यांमधली स्थिती फारच चिंताजनक आहे. म्हणून या महिला प्रवाशांना रेल्वे अर्थसंकल्पाकडून विशेष अपेक्षा आहेत.
रेल्वेच्या महिला डब्यातले हे वाद मुंबईतल्या कोणत्याही महिला रेल्वे प्रवाशासाठी नवे नाहीत. महिला डब्यात चढायचं म्हटलं की भांडणाला सामोरं जाण्याची तयारी ही प्रत्येक महिलेला ठेवावीच लागते.
रेल्वेनं प्रवास करणाऱ्या नोकरदार महिलांची संख्या झपाट्यानं वाढतेय. त्यातच मध्य रेल्वेवरच्या कर्जत, कसारा, आसनगाव, टिटवाळाहून मुंबईत नोकरीसाठी येणाऱ्यांकरता रेल्वे हाच एकमेव आधार... त्यामुळे पहिल्या दोन तीन स्टेशनांतच महिला डबे अक्षरशः भरुन जातात. त्यामुळं त्यानंतरच्या स्टेशनांत गाडीत चढणाऱ्या महिलांना पूर्ण प्रवास उभ्यानं करण्याशिवाय पर्याय नसतो. अशा परिस्थितीत महिला डब्यात सीटवरुन वाद होणं, उभं राहण्यावरुन तंटा उद्भवणं नित्याचंच होऊन बसलंय. त्यामुळे महिला डबे आणि लेडिज स्पेशल रेल्वेची संख्या वाढवणं इतक्याच महिलांच्या मागण्या नाहीत. तर आणखीही अनेक आहेत.
महिला रेल्वे प्रवाशांच्या अपेक्षा
-महिला डब्यातली भांडणं सोडवा
-महिला डब्यात मारामारी टाळण्यासाठी सीसीटीव्ही लावा
-प्रत्येक महिला डब्यात लेडीज काँस्टेबल द्या
-गरोदर महिला, लहान मुलांसाठी राखीव जागा द्या
-स्टेशनवर रेल्वे थांबवण्याच्या वेळेत वाढ करा
-महिला प्रवाशांच्या संख्येनुसार डबे द्या
-डाऊनला जावून रेल्वे पकडण्यावर बंदी आणा
-पॅसेजमध्ये उभं राहण्यावर बंदी आणा
-कर्जत, कसारा गाड्या वाढवा
महिला डब्यांतल्या वादांनी अनेकदा गंभीर रुप घेतल्याचं समोर आलंय. त्यामुळे केवळ महिला डबे वाढवून महिला प्रवाशांचे प्रश्न सुटणार नाहीत.
महाराष्ट्राच्याच रेल्वेमंत्र्यांकडून यंदाचं रेल्वे बजेट सादर होणार असल्यामुळं, मुंबई आणि लगतच्या महिला रेल्वेप्रवाशांना विशेष अपेक्षा आहेत. त्या खरंच पूर्ण होतील, की पुन्हा त्याच गर्दीत, कोंडलेल्या श्वासात महिलांना प्रवास करत रहावा लागणार हे लवकरच स्पष्ट होईल.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.