‘पाऊस येतोय, मुंबईतील घरे खाली करा’

आठवडाभरात पाऊस कधीही मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे. परिस्थिती हातघाईवर आली असताना इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाने अतिधोकादायक म्हणून जाहीर केलेल्या इमारतींत लोक राहत आहेत. त्यांनी तात्काळ घरे खाली करावीत. अन्यथा त्यांना बाहेर काढण्यासाठी फौजदारी करावी लागेल, असा इशारा देण्यात आलाय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jun 6, 2013, 09:06 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
आठवडाभरात पाऊस कधीही मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे. परिस्थिती हातघाईवर आली असताना इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाने अतिधोकादायक म्हणून जाहीर केलेल्या इमारतींत लोक राहत आहेत. त्यांनी तात्काळ घरे खाली करावीत. अन्यथा त्यांना बाहेर काढण्यासाठी फौजदारी करावी लागेल, असा इशारा देण्यात आलाय.
गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर यांनी बुधवारी धोकादायक इमारतींची पाहाणी केली. त्यांच्यासोबत मंडळाचे अध्यक्ष प्रसाद लाड , मुख्यअधिकारी मोहन ठोंबरे आणि अन्य अधिकारी उपस्थित होते. त्यावेळी हा इशारा देण्यात आला. अतिधोकादायक इमारतींमध्ये ८८ कुटुंबे राहात आहेत. पावसाळा सुरू झाल्यानंतर या कुटुंबांना स्थलांतरित करणे कठीण होणार असून, मुसळधार पावसात या इमारती तग धरतील का, हा प्रश्नच आहे. या कुटुंबांना दहा दिवसांची डेडलाइन देण्यात आली असून, या काळात घर रिकामे न केल्यास त्यांना सक्तीने बाहेर काढण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आलेय.
गिरगाव येथील गोवर्धन निवास , भंडारवाडा क्रॉस लेन आणि घोघारी मोहल्यातील तीन अतिधोकादायक इमारतींतील रहिवाशांशी चर्चा करून पाऊस सुरू होण्यापूर्वी घर सोडण्यासाठी विनवणी करण्यात आली. धोकादायक इमारतीत राहणाऱ्या ८८ रहिवाशांपैकी १२ रहिवाशांनी संक्रमण शिबिरात जाण्याचे आधीच मान्य केले आहे. परळच्या जवेरी मेन्शन इमारतीतील २२ रहिवासी, कृष्णभवन येथील ८ रहिवाशांनी येत्या दोन दिवसांत संक्रमण शिबिरात जाण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
तर ४२ जणांच्या स्थलांतराचा प्रश्न येत्या दोन दिवसांत सुटेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत असली तरी उरलेल्या ४६ रहिवाशांनी अजून कोणतेही ठोस आश्वासन दिलेले नाही. या कुटुंबांनी घर सोडण्याची तयारी दाखवली नाही, तर सक्ती करण्याशिवाय कोणताही पर्याय शिल्लक राहणार नाही. नियम ९५ अ अंतर्गत त्यांना सक्तीने घरबाहेर काढले जाईल, असे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय.

तर दुसरीकडे कल्याणमध्ये अनधिकृत बांधकामांबरोबरच सद्य:स्थितीत शहरातील धोकादायक इमारती तोडण्यासंदर्भात केडीएमसीने कारवाईची मोहीम उघडली आहे. या कारवाईसाठी प्रत्येक प्रभाग स्तरावर विशेष पथक नेमण्यात आले आहे. संबंधित इमारतींमधील रहिवाशांनी घर खाली करण्यास विरोध केल्यास संबंधितांविरोधात पोलीस ठाण्यात लेखी तक्रार देण्यात यावी, असा निर्णय नुकताच झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
पावसाळ्याच्या धर्तीवर धोकादायक इमारती तोडण्याची कारवाई महापालिकेकडून सुरू आहे. केडीएमसी क्षेत्रात एकूण ६४२ इमारती धोकादायक अवस्थेत असून, यातील १४१ इमारती या अतिधोकादायक आहेत. सध्या अतिधोकादायक इमारती तोडण्याकडे पालिकेने मोर्चा वळविला आहे. या कारवाईच्या पार्श्वतभूमीवर सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त गणेश देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली.
डोंबिवली ह प्रभाग क्षेत्रातील सुभाष रोडवरील एका अतिधोकादायक इमारतीवर हातोडा घालण्यात आला. तळमजला अधिक दोन मजल्याची सदरची इमारत ४० ते ५० वर्षांपूर्वीची होती. ही अतिधोकादायक असल्याने इमारतीत कोणीही राहत नव्हते, अशी माहिती प्रभाग क्षेत्र अधिकारी लहू वाघमारे यांनी दिली.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.