लंडन : गव्हर्नरपद पुन्हा सांभाळण्यास रघुराम राजन तयार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत, आणखी खूप काही करण्यासारखं असल्याचं रघुराम राजन यांनी म्हटलं आहे.
रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर म्हणून राजन यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ या वर्षी सप्टेंबर महिन्यात संपणार आहे. रघुराम राजन यांनी दुसऱ्यांदा कार्यकाळ देण्यास विरोध होत आहे. यावर विचारलेल्या प्रश्नावर शुक्रवारी राजन म्हणाले, 'आर्थिक वातावरण सुधारण्यासाठी नियोजित गोष्टी प्रत्यक्षात घडण्यास सुरवात झालेली आहे. माझ्यावरील जबाबदारीच्या प्रत्येक क्षणाचा मी आनंद घेतला आहे.'
सत्ताधारी भाजप पक्षातील एक गट राजन यांना पुढे कार्यकाळ देऊ नये, अशी मागणी करत असल्याची चर्चा आहे. यावर दुसऱ्यांदा संधी न दिल्यास त्यांचे उद्दिष्ट अपूर्ण राहील का, यावर राजन म्हणाले, 'आपण खूप काही मिळविले आहे, परंतु मला असे वाटते की कायमच खूप काही गोष्टी करता येण्यासारख्या असतात.'
सरकारकडून त्यांना कार्यकाळ वाढवून देण्याच्या निर्णयाबाबत काहीही माहिती नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.