www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
केईएमच्या रूग्णालयाचे निवासी डॉक्टर ओमप्रकाश शर्मा यांना वयाच्या अवघ्या सत्तावीसव्या वर्षी हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला.
मुंबईतील महापालिकेच्या केईएम रुग्णालयात ओमप्रकाश शर्मा निवासी डॉक्टर होते, ओमप्रकाश शर्मा यांना सोमवारी दुपारी बाराच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्यांनी एम.डी.ची परीक्षा दिली होती.
ओमप्रकाश यांची 13 आणि 14 जूनला एक परीक्षा असल्यामुळे ते मुंबईत थांबले होते. ओमप्रकाश शर्मा हे मूळचे चंद्रपूर येथे राहणारे होते. प्रिव्हेंटिव्ह अॅण्ड सोशल मेडिसिन विभागाचे ते निवासी डॉक्टर होते. ते एल्फिन्स्टन येथील वसतिगृहामध्ये राहत होते.
साखरपुड्याची खरेदी आणि मित्रांसोबतचं शेवटचं जेवण
1 जूनला त्यांची एम.डी.ची परीक्षा संपली होती. याच महिन्यात त्यांचा साखरपुडा होणार होता. रविवारी ओमप्रकाश हे साखरपुडय़ाच्या खरेदीसाठी गेले होते.
संध्याकाळी वसतिगृहामध्ये आल्यावर त्यांनी केलेली खरेदी मित्रांना दाखविली. वसतिगृहातले सगळे मित्र एकत्रच जेवले. यानंतर ओमप्रकाश यांना अॅसिडीटीचा त्रास जाणवू लागला. त्यांच्या एका मित्राने त्यांना एक गोळी दिली. यानंतर त्यांना थोडे बरे वाटले. सकाळी उठल्यावर ओमप्रकाश यांना परत त्रास जाणवू लागला.
म्हणून ते केईएम रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागामध्ये तपासणीसाठी आले होते. या वेळी त्यांचा एक डॉक्टर मित्र तेथेच डय़ुटीवर होता.
अॅसिडीटी आणि पोटात दुखण्याची तक्रार
ओमप्रकाश यांनी माझ्या पोटात दुखतेय, असे या डॉक्टरला सांगितले. ओमप्रकाश यांची तपासणी सुरू होती. त्यांच्या हृदयाचे कार्य पुन्हा सुरू व्हावे, म्हणून डॉक्टरांनी एक तास प्रयत्न केला. मात्र डॉक्टरांना यश आले नाही, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
ही बातमी ओमप्रकाश यांच्या घरी चंद्रपूरला कळवली आहे. त्यांचे आई-बाबा मुंबईला येण्यास निघाले असून रात्री 12 नंतर ते पोहोचतील.
पंचनामा संध्याकाळर्पयत झालेला नव्हता. मंगळवारी सकाळी शवविच्छेदन करण्यात येईल, अशी माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. ओमप्रकाश यांची प्रकृती उत्तम होती. त्याला आधी हृदयासंदर्भात त्रास कधीच नव्हता.
एमडीची परीक्षा झाल्यावर त्याच्याबरोबरचे सगळे मित्र आपल्या घरी गेले होते. 18 तारखेनंतर ओमप्रकाशही घरी चंद्रपूरला जाणार होता. मात्र परीक्षेसाठी तो थांबला होता, अशी माहिती ओमप्रकाशच्या मित्रांकडून मिळाली. मात्र रुग्णालय प्रशासनाने यासंदर्भात कोणतीही माहिती दिलेली नाही.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.