मुंबई : इस्लामिक स्टेट संबंधांवरून मागील काही दिवसात काही जणांना अटक करण्यात आली आहे. यानंतर आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. अटक करण्यात आलेल्या व्यक्तींमध्ये मुदब्बीर मुश्ताक शेख याचा समावेश आहे, जो भारताच्या जनूद-उल-खलीफा-ए-हिंद म्हणजेच भारताच्या खलीफा की सेनाचा प्रमुख आहे.
संघटन उभं करण्यामागे हाच व्यक्ती जबाबदार आहे, या आधी जागतिक दहशतवादी संघटना उभारण्याचा त्याने प्रयत्न केला होता, पण त्याला यश आलं नाही. एका मीडिया रिपोर्टनुसार, चौकशी करणाऱ्यांनी खुलासा केला आहे की, आयटी प्रोफेशनल मुदब्बीर मुश्ताक शेखला हवालाच्या माध्यमातून आठ लाख रूपये मिळाले होते.
शेखला मागील शुक्रवारी मुंब्रामधून अटक करण्यात आली, मुंब्र्यातील एका अपार्टमेंटमधून त्याला ताब्यात घेण्यात आलं. शेखने सांगितलं की त्याने पैशांचा दुरूपयोग नाही केला, यात त्याने बैठकी आणि भरती करण्यासाठी पैसे वापरले.
शेख भारतात दहशतवादी संघटनेसाठी भरती करणारा प्रमुख व्यक्ती आहे. हुसेन खानला ५० हजार रूपये देण्यात आले होते, ज्याला एनआयएने शुक्रवारी अटक केली. तीन लाख लखनौमध्ये राहणाऱ्या व्यक्तीला देण्यात आले, त्याने मुंबईत तसेच इतर राज्यातही काही ठिकाणी पैसे दिले.