भाजपकडून शिवसेनेची बोळवण, ५ मंत्र्यांना शपथ देण्याची तयारी

शिवसेना भाजप युती होण्याचे वृत्त हाती आले असतानाच रात्री उशिरा दोन्ही पक्षांत पुन्हा तिढा वाढल्याचे दिसून आलेय. भाजप शिवसेनेच्या ५ मंत्र्यांना शपथ द्यायला तयार आहे. मात्र, शिवसेनेना १२ मंत्र्यांचा एकाचवेळी शपथविधी करा, यावर ठाम आहे.

Updated: Dec 4, 2014, 08:12 AM IST
भाजपकडून शिवसेनेची बोळवण, ५ मंत्र्यांना शपथ देण्याची तयारी title=

मुंबई : शिवसेना भाजप युती होण्याचे वृत्त हाती आले असतानाच रात्री उशिरा दोन्ही पक्षांत पुन्हा तिढा वाढल्याचे दिसून आलेय. भाजप शिवसेनेच्या ५ मंत्र्यांना शपथ द्यायला तयार आहे. मात्र, शिवसेनेना १२ मंत्र्यांचा एकाचवेळी शपथविधी करा, यावर ठाम आहे.

शिवसेना-भाजपमधला तिढा पुन्हा वाढलाय. ५ डिसेंबरला होणा-या शपथविधीमध्ये शिवसेनेच्या फक्त पाच मंत्र्यांना शपथ देण्याची तयारी भाजपनं दाखवलीय. शिवसेनेला मात्र एकाचवेळी बारा मंत्र्यांचा शपथविधी हवा आहे. तसंच शिवसेनेच्या वाट्याला महामंडळं किती येतील, याचा निर्णयही शिवसेनेला आताच हवा होता, पण आधी मंत्रिमंडळाचं पाहू, मग महामंडळांचं, अशी भाजपची भूमिका आहे. त्यामुळे शपथविधी एक दिवसावर आला असला तरी शिवसेना-भाजपमधला तिढा कायम आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा विस्तार येत्या ५ डिसेंबरला होणार आहे. विधान भवनाच्या आवारात शुक्रवारी संध्याकाळी ४ वाजता हा सोहळा होईल. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे शिवसेनेचे मंत्रीही यावेळी शपथ घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. याचा अर्थ महाराष्ट्रात पुन्हा एकदा भाजप-शिवसेना युतीचे सरकार अस्तित्वात येणार अशी शक्यता असताना पुन्हा तिढा वाढल्याने सस्पेन कायम आहे.

दरम्यान, भाजपचे १० आणि शिवसेनेच्या १२ मंत्र्यांचा शपथविधी ५ डिसेंबरला होणार आहे. शिवसेनेच्या वाट्याला ५ कॅबिनेट आणि ७ राज्यमंत्रीपदे मिळणार आहेत. मात्र मंत्रिमंडळातील सर्व महत्त्वाच्या खात्यांचा कारभार हा भाजपच्या मंत्र्यांकडेच राहणार आहे. भाजपच्या कोअर कमिटीचे सदस्य असलेल्या मंत्र्यांकडील खात्यांचे राज्यमंत्रीपद शिवसेनेला देण्यात येणार नाही, अशी माहिती सूत्रांनी दिलीय.

शिवसेनेच्या वाट्याला काय?
शिवसेनेला सत्ता मिळणार असली तरी कमी महत्त्वाची खाती देण्याचा भाजपचा डाव दिसून येत आहे. शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद नाहीच, गृह, महसूल, ऊर्जा खातेही मिळणार नाही, असेच दिसत आहे. तशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

शिवसेनेला उद्योग खाते, पर्यावरण खातेही शिवसेनेच्या पदरात पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम आणि आरोग्य खातेही मिळण्याची शक्यता असून राज्य उत्पादन शुल्क किंवा परिवहन खात्यावर बोळवण शिवसेनेची केली जाण्याची शक्यता आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.