www.24taas.com, मुंबई
शिवसेनेच्या शिवाजी पार्कवरच्या यंदाच्या दसरा मेळाव्याला मुंबई महापालिकेनं परवानगी नाकारलीय. गेली दोन वर्षं शिवाजी पार्कवर झालेल्या दसरा मेळाव्यामध्ये आवाजाच्या मर्यादेचं उल्लंघन झालं होतं.
शिवाजी पार्क हा परिसर सायलेन्स झोनमध्ये येतो. त्यामुळेच दसरा मेळाव्याला परवानगी नाकारण्यात आलीय. गेल्या 45 वर्षांपासून शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होण्याची परंपरा आहे.
शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला चार दशकांची परंपरा आहे. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी शिवसेनाप्रमुखांनी सुरू केलेला हा मेळावा राज्याच्या राजकारणात देखील महत्त्वाची भूमिका बजावतोय. दसरा मेळाव्याला होणारे बाळासाहेब ठाकरे यांचे भाषण नेहमीच चर्चेचा विषय ठरले आहे.
सातत्याने निव्वळ एका व्यक्तीने विशिष्ट दिवसाचे निमित्त करुन एकाच मैदानवर एवढी वर्षे सभा घेणे आणि त्या गाजवणे हा एक अनोखा विक्रम देखील दसरा मेळाव्याच्या निमित्ताने होत आहे. या ऐतिहासिक बाबी लक्षात घेऊन मुंबई हायकोर्टाने गेल्या दोन वर्षांपासून शिवसेनेच्या सभेला सशर्त परवानगी दिली होती. सभा वेळेत संपवा आणि आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन करू नका अशी बंधने घालून हायकोर्टाने सभेला परवानगी दिली होती.
याआधी २०१० आणि २०११ मध्ये देखील हायकोर्टाने सभा वेळेत संपवा आणि आवाजाची मर्यादा ५० डेसिबलपेक्षा जास्त होणार नाही याची खबरदारी घ्या, असे सांगत दसरा मेळाव्याला परवानगी दिली होती.