www.24taas.com, नवी मुंबई
दक्षिण आफ्रिकेतल्या सफारीत रक्तबंबाळ प्राण्यांसोबत फौजिया खान यांनी फोटो काढल्याचं उघड झाल्यानंतर विरोधक आणि वन्यजीव प्रेमींनी खान यांचा चांगलाच समाचार घेतला होता. पण, ही टीका चुकीची असून फौजिया खान यांनी काढलेल्या फोटोंमध्ये काहीही गैर नसल्याचं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना वाटतंय.
आफ्रिकेत मृत प्राण्यांसोबत काढलेल्या फोटोंमुळे वादात अडकलेल्या राज्यमंत्री फौजिया खान यांची शरद पवार यांनी पाठराखण केलीये. असे फोटो मीदेखील काढून घेतलेत. यात गैर काहीच नाही, असं पवारांनी म्हटलंय. ते नवी मुंबईमध्ये बोलत होते. `आफ्रिकेत असे भुसा भरलेले प्राणी असतातच... याला फार महत्व देऊ नये` असं स्पष्टीकरणही त्यांनी यावेळी दिलंय. तर वनमंत्री पतंगराव कदम यांनीही खान यांच्यावर कारवाई करण्याचा प्रश्नच नसल्याचं म्हटलंय. ‘हे फोटोसेशन राज्यातलंच काय, देशातलंही नाही. त्यामुळे याबाबत कोणतीही अधिकृत माहिती नसल्या’चं कदम म्हणाले.
‘मी तर पशू प्रेमी आहे. पशूसंवर्धन व्हावं अशी माझी इच्छा आहे. मी आणि माझा परिवार दक्षिण आफ्रिकेत सहलीला गेलेलो होतो. आम्ही तेथील शिकार केलेल्या प्राण्यांसोबत फोटो काढले आहेत. मात्र आम्ही कोणत्याही प्रकारची शिकार केलेली नाही. त्यामुळे या गोष्टीचा इतका बाऊ का केला जात आहे?’ असं स्पष्टीकरण फौजिया खान यांनी दिलं होतं.