www.24taas.com, मुंबई
बाळासाहेब ठाकरेंचे अंत्यविधी झाले, त्या ठिकाणी शिवसेनेनं त्यांचं तात्पुरतं स्मारक उभं केलं. मात्र त्यानंतर या स्थळाचा वापर राजकारणासाठी केला जातोय. 24 तास शिवसैनिकांचा खडा पहारा तिथं आहे. यातून शिवसेना नेमकं काय साध्य करणार, हा पहारा तरी किती काळ देणार, असे अनेक प्रश्न उपस्थित होतायत. आणि सरकारही आणखी किती वेळ वाट पाहणार हा प्रश्न आहेच.
17 नोव्हेंबरला बाळासाहेब ठाकरेंचं निधन झालं आणि केवळ शिवसैनिकच नव्हे, तर सगळा महाराष्ट्र शोकसागरात बुडाला. त्यावेळी शिवसेनेनं अंत्यसंस्कारासाठी शिवाजी पार्कची परवानगी मागितली आणि ती त्यांना मिळालीही... 18 नोव्हेंबरला निघालेल्या त्यांच्या अंत्ययात्रेसाठी देशभरातून लाखो शिवसैनिक आले आणि नजिकच्या काळातली सर्वात मोठी अंत्ययात्रा मुंबईनं अनुभवली. या अंत्ययात्रेत शिवसैनिकांनी अभुपूर्व शांततेचं दर्शन घडवलं.
त्यानंतर सुरू झालं ते अंत्यविधी स्थळावरून राजकारण... शिवसेना नेत्यांच्या बेताल वक्तव्यांनी हा वाद पेटवला. याचं पावित्र्य रामजन्मभूमीसारखं आहे इथपासून ते कायदा हातात घेण्यापर्यंतची भाषा सेना नेत्यांनी वापरली..
अंत्यविधी स्थळाची लढाई ही जणू आपल्या अस्तित्वाची लढाई आहे, अशा पद्धतीनं शिवसेनेचे हे नेते बोलू लागले. आपणच कसे निष्ठावंत आहोत, हे दाखवण्याची चढाओढ त्यांच्यात सुरू झाली..
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि महापालिकेनं कणखर भूमिका घेत हे तात्पुरतं बांधकाम हटवण्याचा निश्चय कायम ठेवला... शिवसेनेनं दिलेला शब्द पाळला नाही, असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलं.
मग सुरू झाला 24 तास पहारा... शिवसैनिकांच्या चक्क शिफ्ट लागल्या शिवाजी पार्कात... आता प्रश्न हा आहे, की असा पहारा किती काळ देणार? किती काळ शिवाजी पार्क, सरकार आणि महापालिकेला वेठीला धरणार? हे सगळं कुणाच्या संमतीनं सुरू आहे? पहारा देणारे शिवसैनिक कुठले आहेत?
हे असं केल्यानं सहानुभूती मिळेल आणि तिचं परिवर्तन मतांमध्ये होईल, असं शिवसेना नेत्यांना वाटत असेल, तर ती कल्पना भ्रामकच आहे. या केविलवाण्या प्रयत्नांतून शिवसेना अधिक केविलवाणी होत असल्याचं हे त्यांच्या लक्षात येत नाहीये का? खरंतर या नेत्यांना कुणीतरी `फटकारे` मारण्याची गरज आहे. अन्यथा शिवाजी पार्कवरून उगीचच छेडला गेलेला वाद हाच शिवसेनेचं व्यंगचित्र ठरण्याचा धोका आहे.