सहिष्णूतेवर शिवसेनेची नरेंद्र मोदींवर खरमरीत टीका

पुन्हा एकदा शिवसेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. पाकिस्तानशी हातमिळवणी करत भारताने खरी सहिष्णुता दाखवून दिलेय, अशी बोचरी टीका शिवसेनेने आपल्या 'सामना' या मुखपत्रातून अग्रलेखाच्या माध्यमातून केलेय.

Updated: Dec 2, 2015, 02:16 PM IST
सहिष्णूतेवर शिवसेनेची नरेंद्र मोदींवर खरमरीत टीका   title=

मुंबई : पुन्हा एकदा शिवसेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. पाकिस्तानशी हातमिळवणी करत भारताने खरी सहिष्णुता दाखवून दिलेय, अशी बोचरी टीका शिवसेनेने आपल्या 'सामना' या मुखपत्रातून अग्रलेखाच्या माध्यमातून केलेय.

मोदी यांनी पाकिस्तानी पंतप्रधान नवाज शरीफ यांचा हात पॅरिस मुक्कामी हातात घेऊन मोठीच सहिष्णुता दाखवून दिली. दुसर्‍याने हात उगारला तरी आपण हात जोडूनच सामोरे गेले पाहिजे. हीच आपली सहिष्णुता असून देशाचे पंतप्रधान मोदी यांनी ती पाळली आहे, अशा शेलक्या शब्दात टोमणा मारला.

मोदींनी शरीफ यांच्या हात मिळवल्यानंतर शिवसेनेने मोदींच्या पाठराख्या नेत्यांना सल्ला दिलाय. देश असहिष्णू झाल्याची बांग ठोकत कुणाला देश सोडण्याची गरज नाही. देश योग्य वळणावर आहे. मोदी यांच्या टीकाकारांनी याचे भान ठेवायलाच हवे, असा चिमटा शिवसेनेने काढलाय.

अग्रलेखात काय म्हटलेय?
पॅरिसच्या पर्यावरण संमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नवाज शरीफ यांची भेट झाली. त्यामुळे देशातील राजकीय पर्यावरण अचानक बदलले. देशात असहिष्णुतेवरून गोंधळ व संसदेत गदारोळ माजला आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानी पंतप्रधान नवाज शरीफ यांचा हात पॅरिस मुक्कामी हातात घेऊन मोठीच सहिष्णुता दाखवून दिली. 

शरीफ यांचे म्हणणे असे की, अचानक मोदी समोर आले. हस्तांदोलन झाले. मग मोदी यांनी माझा हात धरून सोफ्यावर बसवले व आमच्यात थोडी चर्चा झाली! जो देश व त्या देशातील आतंकवादी हिंदुस्थानच्या मुळावर उठले आहेत, रोज धमक्या देत आहेत, सैनिकांचे मुडदे पाडत आहेत अशा देशाच्या पंतप्रधानांशी इतक्या विनम्रतेने वागून चर्चा करणे ही सहिष्णुताच नव्हे काय? 

कसाबला मानवंदना

मोदी यांनी सहिष्णुतेचे जे अपार दर्शन घडवले त्यामुळे या देशात असहिष्णुतेवरून जे वादळ उठले आहे ते थंड व्हायला हवे. मोदी यांनी शरीफ यांच्याशी हस्तांदोलन केले यावर विरोधकांनी टीका करण्याचे कारण नाही. शरीफ यांच्या याच हाताने हिंदुस्थान-पाकिस्तान क्रिकेट मालिकेस परवानगी दिली व या परवानगी पत्रावर सही करण्याचा मुहूर्त निवडला तो ‘२६/११’चा! म्हणजे शरीफ यांनी मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा अतिरेकी मोहम्मद अजमल कसाब याला एकप्रकारे मानवंदनाच दिली! 

हा हिंदुस्थानची कळ काढण्याचाच प्रकार आहे. त्यामुळे शरीफ यांची विचारपूस करता करता मोदी यांनी त्यांना त्याविषयी नक्कीच जाब विचारला असेल. ‘‘हिंदुस्थान-पाक क्रिकेट सामन्यांना मंजुरी देण्यासाठी ‘२६/११’ शिवाय दुसरा मुहूर्त तुम्हाला सापडला नाही काय?’’ अशा शब्दांत मोदी यांनी शरीफमियांना खडसावले असेल आणि त्यामुळे ज्या सोफ्यावर शरीफ मियां बसले होते तो सोफाही थरारला असेल.  

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.