मुंबई महापालिकेतील अजब चोरीची गजब कथा!

मुंबई महापालिकेचा अख्खाच्या अख्खा रेन वॉटर हार्वेस्टिंगचा प्रकल्प विभागीय कार्यालयातून चोरीला गेलाय.

Updated: Jul 16, 2014, 08:44 PM IST
मुंबई महापालिकेतील अजब चोरीची गजब कथा! title=

मुंबई: मुंबई महापालिकेचा अख्खाच्या अख्खा रेन वॉटर हार्वेस्टिंगचा प्रकल्प विभागीय कार्यालयातून चोरीला गेलाय.

 

जाऊ तिथं खाऊ या सिनेमासारखंच मुंबई महापालिकेत प्रत्यक्ष घडलंय. फक्त त्याची पोलीस दप्तरी नोंद करण्यात आलेली नाही, इतकंच... पावसाच्या लहरीपणाचे चटके सोसणाऱ्या महापालिका प्रशासनानं 2009 साली आपल्या आस्थापना, शाळा, बागांमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प राबवायला सुरुवात केली. 

या उपक्रमाअंतर्गत मार्च 2010मध्ये महापालिकेच्या के. पूर्व विभागीय कार्यालयातही योजना राबवण्यात आली. त्यासाठी तेरा लाख रुपये खर्च करण्यात आल्याची नोंद महापालिका दप्तरी आहे. मात्र प्रत्यक्ष या कार्यालयाच्या आवारात पाहाणी केल्यावर कुठेच हा प्रकल्प राबवल्याचं आढळून येत नाही. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे असा कुठला प्रकल्प आहे याची कल्पना विभागीय कार्यालयातल्या अधिकाऱ्यांना नाही. 

रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या प्रकल्पाऐवजी विभागीय कार्यालयाच्या आवारात आढळतं गटारात वाहून जाणारं पावसाचं पाणी. इमारतीच्या गच्चीवर साचणारं पाणी वाहून आणण्यासाठी कुठलीही पाईप लाईन नाही. ना पाणी साठवण्यासाठी टाक्या.... पण खर्च झालाय लाखोंमध्ये... या गोंधळाबाबत कॅमेरावर कुणाही प्रतिक्रिया द्यायला तयार नाही. मात्र, या प्रकल्पाची कल्पना नसलेल्या सहाय्यक आयुक्त डॉ. भाग्यश्री कापसे यांनी आता कार्यालयाच्या आवारात रेन वॉटर हार्वेस्टिंगचा शोध घ्यायला सुरुवात केलीय. अभियंता विभागातले अधिकारीही मि. मु. घळससी या प्रकारानं चक्रावलेत.

कागदावर दाखवलेला... पण अस्तित्वात नसलेला आणि कहर म्हणजे त्यावर खर्च झालेला प्रकल्प मुंबई महापालिकेतच आढळू शकतो, म्हणूनच सलाम मुंबई महापालिकेला...

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.