मुंबई : राज्यात शिवसेना, मनसे, भाजपने जोरदार प्रचारात आघाडी घेतली आहे. मात्र, त्यामानाने काँग्रेसकडे स्टार प्रचारक नसल्याने काँग्रेस मागे पडल्याचे चित्र आहे. काँग्रेसकडून पक्ष अध्यक्ष सोनिया गांधी यांना प्रचारासाठी मागणी आहे. मात्र, आज पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी मैदानात उतरत असल्याने काँग्रेस गोटात थोडी धास्ती वाढलेली दिसत आहे. राहुल पेक्षा सोनिया गांधी हव्यात अशी मागणी आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्य विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सभांवर सभा घेण्याची आघाडी उघडल्याच्या पार्वभूमीवर काँग्रेसच्यावतीने पक्षाध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल हे उद्यापासून मैदानात उतरत आहेत. काँग्रेसमध्ये मात्र राहुलपेक्षा सोनियांच्या सभांना उमेदवारांकडून जास्त मागणी करण्यात येत आहे.
मोदी यांच्याशी सामना करण्याच्या उद्देशाने काँग्रेसने सोनिया आणि राहुल या दोघांनाही उतरविले आहे. राहुल गांधी यांची आज कोकणातील महाड आणि लातूरमधील औसा येथे जाहीर सभा होणार आहेत. पक्षाध्यक्षा सोनिया गांधी या गुरुवारी राज्याच्या दौऱ्यावर येत असून, कोल्हापूर आणि औरंगाबादमध्ये जाहीर सभा होणार आहेत.
पहिल्या टप्प्यात मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात काँग्रेस नेत्यांच्या सभा होणार आहेत. दुसऱ्या टप्प्यात विदर्भ आणि मुंबईत सोनियांच्या सभांचे आयोजन केले जाणार आहे. राहुल गांधी यांच्या सभा प्रत्येक विभागात घेण्याची पक्षाची योजना आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.