पनवेल टू मंत्रालय… व्हाया ‘ईस्टर्न फ्री वे’!

राज्य परिवहन विभागाने पनवेलमधून मंत्रालयाकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ईस्टर्न फ्री वेवरून बससेवा सुरू केलीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jul 25, 2013, 10:24 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
राज्य परिवहन विभागाने पनवेलमधून मंत्रालयाकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ईस्टर्न फ्री वेवरून बससेवा सुरू केलीय.

दिवसाला आठ बसेस पनवेल ते मंत्रालय धावणार आहेत... या बससेवेचं वैशिष्ट्यं म्हणजे नुकत्याच सुरू झालेल्या ‘ईस्टर्न फ्री वे’वरून या बस धावणार आहेत. याचा फार मोठा फायदा बेलापूर, खारघर, कामोठा, वाशी या भागातल्या नागरिकांना होणार आहे. नागरिकांच्या वेळेसोबत पैशाचीही बचत होऊ शकेल. सकाळच्या वेळात नवी मुंबईकरांना दक्षिण मुंबईत येण्यासाठी रेल्वे गाड्यांतल्या गर्दीचा सामना करावा लागतो. बससेवेमुळे तो भारही थोडा हलका होईल.

येत्या सोमवारी म्हणजेच २९ जुलै रोजी सकाळी आठ वाजता पहिली बस या मार्गावरून धावणार आहे. बेस्ट प्रशासनानंही कफ परेड ते वाशी या मार्गावर ईस्टर्न फ्रीवेद्वारे बससेवा सुरू केली आहे. सकाळच्या वेळातच बेस्टची ही सेवा उपलब्ध आहे. मात्र, एसटीची ही सेवा दिवसभर म्हणजेच सकाळी आठ ते रात्री साडे नऊपर्यंत सुरू राहील. नजीकच्या काळात या फेऱ्यांतही वाढ करण्यात येणार असल्याचं एसटी प्रशासनानं आश्वासन दिलंय. तसंच या मार्गावर एसी बसेस सुरू करण्याचाही एसटीचा विचार आहे.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.