दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : दारूबंदीतून पळवाट काढण्यास राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावतेंनी आक्षेप घेतला आहे. दिवाकर रावतेंनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून आक्षेप नोंदविला आहे.
रावते यांनी राज्य़ रस्ता सुरक्षा परिषदेचे अध्यक्ष या नात्याने पत्र पाठविले आहे. राज्यातील महामार्ग महापालिकेकडे हस्तांतरीत करण्याच्या निर्णयाला आक्षेप घेतला आहे.
या निर्णयामुळे न्यायालयाच्या अवमान याचिकेस सामोरे जावे लागण्याची शक्यता असल्याचेही या पत्र म्हटले आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे आदेश दारूबंदीसाठी नसून रस्ता सुरक्षा संदर्भात आहे. पळवाट काढून सरकारच दारूविक्रीला प्रोत्साहन देत असल्याची नागरिकांची भावना होत असल्याचे रावते यांनी म्हटले आहे.
पुरोगामी राज्याने असा निर्णय घेणे योग्य नाही, असेही म्हटले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांची कर्मचाऱ्यांना वेतन देण्याइतपत आर्थिक परिस्थिती नसताना त्यांच्याकडे महामार्ग हस्तांतरीत झाल्यास महामार्गांची परिस्थिती आणखी बिकट होऊन अपघातांचे प्रमाण त्यामुळे वाढण्याची शक्यता आहे.