मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फेरबदल होणार याचे संकेत आधीच देण्यात आले होते. त्याच पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष निवडण्यात आले आहेत. सुनील तटकरे यांच्या राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आलीय.
प्रदेशाध्यक्षपद स्वीकारल्यानंतर सुनील तटकरे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणीच्या बैठकीत ही निवड प्रक्रिया झाली. विद्यमान प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी हा प्रस्ताव बैठकीत मांडला. तर जितेंद्र आव्हाड, उमेश पाटील आदी नेत्यांनी प्रस्तावाला अनुमोदन दिलं. त्यानंतर सुनील तटकरे यांना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष म्हणून घोषित करण्यात आलं.
सुनील तटकरे यांना प्रदेशाध्यक्षपद दिल्यानंतर भास्कर जाधव यांची पुन्हा मंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. लोकसभेच्या पराभवानंतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राज्यात प्रभावी नेतृत्व देण्याची मागणी केली होती. प्रदेशाध्यक्षपदासाठी आर आर पाटील, सुनील तटकरे आणि छगन भूजबळ यांचं नाव आघाडीवर होतं. मात्र प्रदेशाध्यक्षपदाची माळ अखेर सुनील तटकरे यांच्या गळ्यात पडली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता सुनील तटकरे राष्ट्रवादी काँग्रेसला किती यश मिळवून देतात हे पाहणं औत्युक्याचं ठरेल.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.