मुंबई : तंग कपड्यांमुळे महिलांवर बलात्कार होतात, असा युक्तिवाद एता 'पूर्वी महिला तंग कपडे परिधान करत नव्हत्या. आता जीन्ससारखे मॉडर्न आणि अंगप्रदर्शन करणारे तंग कपडे परिधान करू लागल्याने बलात्काराच्या घटना वाढत आहेत,' असा युक्तिवाद जनहित याचिकादार चंद्रकांत पालव यांनी बुधवारी मुंबई हायकोर्टात केला. त्यावेळी याचिकेशी संबंधित वकिलांनी तीव्र विरोध केला असता सर्वसामान्य माणूस याविषयी कसा विचार करतो, ते आम्हाला ऐकायचे आहे, असे म्हणत खंडपीठाने त्यांना बोलण्याची संधी दिली.
महिलांवरील अत्याचार तसेच अन्य प्रश्नांबाबत निवृत्त न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी समितीचा अहवाल, हेल्प मुंबई फाऊंडेशनची जनहित याचिका आणि वृत्तपत्रातील बातमीची स्वतःहून दखल घेत दाखल करून घेतलेली जनहित याचिका यावर न्या. नरेश पाटील आणि न्या. एस. बी. शुक्रे यांच्या खंडपीठासमोर सध्या सुनावणी सुरू आहे.
याचिकादार पालव यांनी आपले म्हणणे मांडण्यास सुरुवात केली आणि म्हणाले, 'पूर्वी महिला अंगावर पूर्ण वस्त्र परिधान करायच्या. नंतर कुर्ता पायजमा आला. आता जीन्ससारखे मॉडर्न कपडे आणि अन्य तंग कपडे आले. मुली आणि महिला असे कपडे घालत असल्यानेच बलात्काराच्या घटना वाढायला लागल्या.
लहान मुलेही कम्प्युटर, मोबाइलवर काहीही पाहतात. अशा गोष्टींवर बंदी घालण्याची मागणी पूर्वीही झाली होती,' असे म्हणणे ते त्वेषाने मांडत असतानाच चव्हाण, जामदार, अडेनवाला तसेच सरकारी वकील पी. पी. काकडे यांनी त्याला तीव्र विरोध दर्शवला. त्यावेळी सामान्य माणूस अशा ड्रेसकोडविषयी काय विचार करतो, ते आम्हाला ऐकायचे आहे, असे म्हणत न्या. पाटील यांनी पालव यांना बोलू देण्याची संधी दिली. त्यानुसार पालव यांनी पुन्हा बोलण्यास सुरुवात केली.
अखेर देशात अगदी तीन-चार वर्षांच्या लहान मुलींवरही बलात्कार होतो, मग त्यांचा कोणता ड्रेसकोड कारणीभूत ठरतो, पालव यांचा अजब युक्तिवाद कसा मान्य करता येईल, असे म्हणणे चव्हाण यांनी मांडले. अन्य वकिलांनीही हीच भूमिका मांडली. त्यानंतर खंडपीठाने पालव यांचे आणखी म्हणणे ऐकण्यास नकार देत सुनावणी तहकूब केली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.