www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
ज्यांनी आयुष्यभर लोकांना गंडवलं त्या शरद पवार यांना गंडा आणि शिवबंधनातला फरक काय कळणार, असा सणसणीत टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना लगावला. मुंबईत एका कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
शरद पवार यांनी शिवबंधनाच्या माध्यमातून गंडेदोरे बांधायचा प्रकार जादूटोणाविरोधी कायद्याचा भंग करणारा आहे, अशी प्रतिक्रिया शुक्रवारी व्यक्त केली होती. पवारांच्या या विधानाचा उद्धव ठाकरे यांनी चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले, आम्ही शिवबंधनाला कधीच गंडा म्हटलं नाही. आम्ही त्याला शिवबंधन म्हटलंय. हा साधा फरकही टीकाकारांना कळला नाही. पण बरं झालं, या निमित्तानं पवारांच्या मनातलं हिंदुत्व विरोधाचं विषच बाहेर आलं, अशी बोचरी टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली.
जादूटोणाविरोधी कायदा हा हिंदुत्वाच्या विरोधातला आहे. म्हणूनच हा कायदा आम्ही मानत नाही. शिवबंधनाच्या धाग्याला जादूटोणा म्हणतात मग रक्षाबंधनालाही जादूटोणा म्हणणार काय? उद्या या अघोरी कायद्याचा वापर करून रक्षाबंधनावर बंधनं आणणार असतील तर जादूटोणाविरोधी कायदा मोडूनतोडून काढू, असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.