मुंबई : मनसेच्या एका खुल्या पत्रामुळे मुंबईत पुन्हा एकदा व्हेज - नॉन व्हेजचा वाद पेटणार, असं दिसतंय.
एका खुल्या पत्राद्वारे मनसेनं मुंबईतील बिल्डर्सना धमकी वजा इशारा दिलाय. सदनिका विकताना भेदभाव केल्यास मनसे स्टाईलने धडा शिकवू, अशी धमकीच मनसेनं बिल्डरांना दिलीय.
सदनिका विकताना जाती-धर्म-आहाराच्या नावाखाली भेदभाव न करण्याचे हमी पत्र देण्याची मागणी मनसेनं बिल्डरांकडे केलीय. हे हमी पत्र न दिल्यास त्याचे परिणाम भोगावे लागू शकतात, असाही इशारा करण्यात आलाय.
महत्त्वाचं म्हणजे, गेल्या वर्षी मनसेच्या मागणीनंतर महापलिका सभागृहाने एक प्रस्तावही तयार केला होता. यात आहाराच्या मुद्द्यावर घर नाकारणाऱ्या बिल्डरला ओसी आणि आयओडी देऊ नये, असं म्हटलं गेलं होतं. या प्रस्तावाला भाजप वगळता सर्व राजकीय पक्षांनी दिला होता पाठिंबा दिला होता. मात्र, आता प्रशासानंही माघार घेतल्याचं दिसतंय.
आहाराच्या नावाखाली सदनिका नाकारणाऱ्या बिल्डर्सवर कारवाईचा कायदा तयार करण्यास महापालिकेनं असमर्थता दर्शवलीय. महापालिका प्रशासनाचा अभिप्राय, तसा कायदा बनवणे कठीण. पण कुणाला घर नाकारल्यास त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार करावी, असा सल्लाही महापालिकेनं दिलाय.