रिपाइंमध्ये अस्वस्थता, आठवलेंच्या पदरात नेमकं पडणार काय?

लोकसभा निवडणुका अगदी जवळ येऊन ठेपल्या असतानाही जागावाटपाबाबत काहीही चर्चा होत नसल्याबद्दल महायुतीतल्या रिपाइंमध्ये अस्वस्थता आहे. महायुतीतून बाहेर पडण्यासाठी पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्यावर कार्यकत्यांचा दबाव वाढतोय.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Dec 31, 2013, 08:59 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
लोकसभा निवडणुका अगदी जवळ येऊन ठेपल्या असतानाही जागावाटपाबाबत काहीही चर्चा होत नसल्याबद्दल महायुतीतल्या रिपाइंमध्ये अस्वस्थता आहे. महायुतीतून बाहेर पडण्यासाठी पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्यावर कार्यकत्यांचा दबाव वाढतोय.
लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता सुरु होईल, मात्र महायुतीतल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वाढत्या नाराजीमुळं शिवसेना-भाजपची डोकेदुखी वाढण्याची चिन्ह आहेत. राज्यसभेसाठी आठवलेंना दोन्ही मित्रपक्षांकडून काहीही ठोस आश्वासन मिळत नाही, तसंच जागावाटपाची चर्चाही होत नसल्यामुळं रिपाइंत अस्वस्थता आहे.
अशा परिस्थितीत शिवसेना-भाजपशी आधीच विविध मुद्यांवर मतभेद असल्यानं महायुतीतून बाहेर पडण्यासाठी पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवलेंवर कार्यकत्यांचा दबाव वाढतोय. रविवारी झालेल्या मुंबईच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत शिवसेना-भाजपशी असलेली मैत्री तोडा अशी आग्रही मागणी पदाधिकारी-कार्यकत्यांनी आठवलेंना केली. सध्यातरी आठवलेंनी कार्यकत्यांना सबुरीचा सल्ला दिलाय.
आठवलेंना आपल्या कोट्यातली राज्यसभेची जागा द्यायला शिवसेनेनं याआधीच असमर्थता दर्शववलीय. भाजप राष्ट्रीय पक्ष असल्यानं त्यांच्या अन्य राज्यातील कोट्यातून आठवलेंची राज्यसभेवर वर्णी लावणं शक्य असल्याचं शिवसेनेनं सूचवलंय.
लोकसभेसाठी शिवसेना- भाजपचा २२-२६ हा फॉम्युला निश्चित झालाय. मात्र या दोन्ही पक्षांकडे रिपाइंनं सहा जागांची मागणी केलीय. त्यात दक्षिण मध्य मुंबई, कल्याण, पुणे, लातूर, वर्धा, सातारा या जागा आहेत. सहा पैकी किमान तीन जागा तरी मिळाव्यातच यासाठी रिपाइं आग्रही आहे. शिवसेनेनं आपल्या कोट्यातली सातारा ही एकच जागा सोडण्याची तयारी दर्शवल्याची प्राथमिक माहिती आहे. रिपाइंचा सर्वाधिक आग्रह असलेल्या लातूर आणि वर्धा या जागा भाजपच्या कोट्यातल्या आहेत.
सध्या तरी आठवलेंची वेट अँड वॉचची भूमिका दिसतेय. पण जसजशी निवडणूक जवळ येईल तसा हा संघर्ष आणखी वाढत जाणार आहे. त्यामुळं आठवलेंच्या पदरात नक्की काय पडतं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.