मुंबई : शिवजयंतीसाठी मनसेचा झेंडा बदलण्यामागचा राज ठाकरेंचा नेमका अजेंडा काय असावा? याबद्दल आता विविध तर्क लढवले जाऊ लागलेत. मराठी अस्मिता आणि हिंदूत्व अशा दोन रुळांवर मनसेचं इंजिन यापुढे धावणार का? याकडे लक्ष असणार आहे.
राजकारणात भूमिका बदलायच्या दिवसांत राज ठाकरे यांच्या पक्षानं तर त्यांचा झेंडाच बदललाय. हा झेंडा फक्त शिवजयंतीला आणि त्यातही तिथीनुसार येणाऱ्या शिवजयंतीला वापरायचा आहे, असं राज ठाकरे सांगितलं आहे. मात्र, झेंडाच्या आडून त्यांची भूमिका लपून राहिलेली नाही.
मनसेचा मूळ झेंडा हा चौरंगी आहे. त्यात भगवा आहे, निळा आहे, पांढरा आहे आणि हिरवा सुद्धा आहे. या सगळ्या रंगांची आठवण राज ठाकरे यांना तिथीनुसार येणाऱ्या दर शिवजयंतीला आजवर येत होती. पण, आता मनसेला २०१६ मध्ये साजरी होत असलेल्या शिवजयंतीला हे रंग नकोसे झालेत का? असा प्रश्न पडावा.
कारण हा नवा चौकोनी झेंडा नीट पाहा. यात फक्त भगवा रंग आहे आणि त्यावर फक्त शिवमुद्रा आहे. त्याखाली फक्त पक्षाचे नाव आहे. आजवर राजकीय पक्षांनी चिन्ह बदलली, नेते बदलले, पण एखाद्या १० वर्षं जुन्या पक्षानं झेंडाच बदलावा हा प्रकार कदाचितच या आधी घडला असावा...
तिथीनुसार शिवजयंती तर त्यांच्या पक्षांच्या स्थापनेपासून होतेय मग हे सगळं करायला राज ठाकरे यांना २०१६ साल का उजाडावं लागलं? तर याचं उत्तर आहे २०१७ च्या सुरुवातीत... या वर्षाच्या सुरुवातीला राज्यात डझनभर महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत.
मनसेसाठी हे मोठ्ठं आव्हान आहे. पक्ष आज आपला पहिला महापौर गमावून बसलाय. ज्या नाशिकनं भरभरून मतं दिली त्या शहरात फारसा बदल झाला नसल्याचा तिथल्या लोकांचा आणि राजकीय विरोधकांचा आरोप आहे. नाशिकनंतर मुंबईत पक्षासमोर कमकुवत संघटना हे प्रमुख आव्हान आहे.
या सगळ्यात पक्षाला नव्या उभारासाठी राज ठाकरेंना कदाचित भगवा जवळचा वाटत असावा आणि त्यासाठी तिथीनुसार आलेली शिवजयंती निमित्तमात्र असावी...