मुंबई : मुंबईमध्ये शिवसेना-भाजपाच्या युतीची चर्चा सुरू आहे, असं सांगितलं जात असलं तरी त्यात अडथळेच अधिक येतायत. भाजपा नेत्यांनी शिवसेनेवर टीका सुरूच ठेवल्यामुळे शिवसेना नेते संतापलेत. मात्र चर्चा थांबण्याचं ताज कारण हे वेगळंच असल्याचं सांगितलं जातंय.
शिवसेना-भाजपा युतीचं घोडं पुन्हा अडलं... ते अडणारच होतं... एकीकडे युतीची चर्चा सुरू असताना भाजपा नेते करत असलेली टीका शिवसेनेला झोंबलीय. किरीट सोमय्या आणि आशिष शेलार यांच्याकडून शिवसेनेला लक्ष्य केलं जातंय. या टीकेला शिवसेनेचे नेते वैतागलेत. ही टीका अशीच सुरु राहणार असेल तर जागावाटपाच्या बैठकीला जाण्यात अर्थ नाही, अशी भूमिका शिवसेना नेत्यांनी उद्धव ठाकरेंकडे मांडलीय.
आता या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनीच हस्तक्षेप करावा आणि ही टीका थांबवावी, असं शिवसेना नेते म्हणतायत. अगतिकता दाखवून युती करण्यापेक्षा स्वबळावर लढावं, अशी मागणी होऊ लागलीय.
खरंतर भाजपानं मागितलेल्या 114 जागांची यादी तयार आहे. ही यादी गुरूवारी शिवसेनेला दिली जाणार होती. मात्र त्यावर आता शिवसेना काहीच बोलायला तयार नाही. भाजपाच्या एका नेत्यानं खासगीत याचं वेगळंच कारण सांगितलंय. या 114 मधले काही वॉर्ड हे विद्यमान शिवसेना नगरसेवकांचे असण्याची शक्यता आहे. त्यामुळे यादी बाहेर आली तर हे नगरसेवक भाजपाचा रस्ता धरतील, अशी भीती शिवसेनेला वाटतेय. त्यामुळेच शिवसेनेनं जागावाटपाची चर्चा अचानक थांबवल्याची कुजबुज राजकीय क्षेत्रात सुरू आहे. तर शिवसेना-भाजपाचा हा नेहमीचा खेळ असून मुंबईकरांनी याला भुलू नये, असं आवाहन मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केलंय.
कारण शिवसेना म्हणते ते असो, की भाजप नेते खासगीत सांगतात ते असो की निरुपम म्हणतात तसा हा सगळा फार्स असो... निवडणुका आणि उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख जवळ आली असताना युतीमध्ये चर्चा कमी अन् गोंधळ जास्त अशीच स्थिती आहे.