केडीएमसी आणि कोल्हापूरात भाजपचा महापौर - दानवे

राज्यातील महापालिका तसेच नगरपालिका - नगरपंचायतींच्या निवडणुकात भारतीय जनता पक्षाची राजकीय ताकद वाढली असून पक्षाच्या नगरसेवकांची संख्या अनेक पटींनी वाढली आहे.

Updated: Nov 3, 2015, 02:27 PM IST
केडीएमसी आणि कोल्हापूरात भाजपचा महापौर - दानवे  title=

भाजपाच्या नगरसेवकांच्या संख्येमध्ये अनेक पटींनी वाढ 

मुंबई : राज्यातील महापालिका तसेच नगरपालिका - नगरपंचायतींच्या निवडणुकात भारतीय जनता पक्षाची राजकीय ताकद वाढली असून पक्षाच्या नगरसेवकांची संख्या अनेक पटींनी वाढली आहे. या जनादेशाबद्दल आपण मतदारांचे आभार मानत असून भाजपा शक्य तेथे सत्ता स्थापन करून विकासाचे वचन पूर्ण करेल, असे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब पाटील दानवे यांनी सोमवारी सांगितले. कल्याण डोंबिवली आणि कोल्हापुरात शक्य झाले तर महापौर भाजपचा असेल असा विश्वास दानवे यांनी व्यक्त केला.

ज्या ठिकाणी भाजपला जास्त जागा मिळाल्या आहेत, तिथे सत्ता स्थापनेसाठी जुळवाजुवळ करण्याचा प्रयत्न सुरु आहे. भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असंही दानवेंनी सांगितलं.

ते म्हणाले की, कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत भाजपाच्या नगरसेवकांची संख्या नऊवरून सुमारे पाचपटींनी वाढून ४२ झाली आहे. कोल्हापूर महापालिकेतही भाजपाच्या नगरसेवकांची संख्या अनेक पटींनी वाढली आहे. राज्यात ठिकठिकाणी नगरपालिका व नगरपंचायतींच्या निवडणुकीत भाजपाला चांगले यश मिळाले असून किमान ३१ ठिकाणी भाजपा सत्तेवर येण्याच्या स्थितीत आहे. राज्यातील भाजपा सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर लगेचच मतदारांनी भाजपाला भरभरून पाठिंबा दिला आहे. विकासाची वचनपूर्ती करण्याची आपली नैतिक जबाबदारी पार पाडण्यासाठी भाजपा शक्य तेथे सत्ता स्थापन करेल.

पाहा संपूर्ण निकाल

कडोंमपा निवडणूक: पाहा प्रभाग क्रमांक १ ते २९ चा निकाल

कडोंमपा निवडणूक: पाहा प्रभाग क्रमांक ३० ते ६० चा निकाल

कडोंमपा निवडणूक: पाहा प्रभाग क्रमांक ६१ ते ९० चा निकाल

कडोंमपा निवडणूक: पाहा प्रभाग क्रमांक ९१ ते १२२ चा निकाल

त्यांनी सांगितले की, गेले वर्षभर राज्यातील भाजपा सरकारने अनेक आव्हाने असूनही चांगल्या रितीने विकासाची कामे केली. कल्याण डोंबिवली व कोल्हापूर महापालिकांच्या निवडणुकांत भाजपा विकासाच्या मुद्द्यावर जनतेला सामोरी गेली होती. गेल्या वेळच्या निवडणुकीतील भाजपाची कामगिरी ध्यानात घेता यावेळी मतदारांनी भाजपाच्या नगरसेवकांची संख्या अनेक पटींनी वाढविल्याचे स्पष्ट होते. राज्यातील कोकण, उत्तर महाराष्ट्र,मराठवाडा आणि विदर्भ अशा सर्व विभागातील नगरपालिका व नगरपंचायतींमध्ये निवडणुकीत भाजपाला चांगले यश मिळाले असून अनेक ठिकाणी पक्षाला बहुमत मिळाले आहे. अशा स्थितीत भाजपा आपले विकासाचे वचन पूर्ण करण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल.

ते म्हणाले की, ठाणे जिल्ह्यातील मुरबाड, अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत, नाशिक जिल्ह्यातील देवळा, औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव, लातूर जिल्ह्यातील जळकोट, बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर, यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव, भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर, वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर, चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णा अशा राज्यभरातील ३१ नगरपालिका - नगरपंचायतींमध्ये भाजपा स्वबळावर अथवा मित्रपक्षांसह सत्ता स्थापन करण्याच्या स्थितीत असल्याचे सोमवारच्या निकालानंतर स्पष्ट झाले आहे.

भाजपाच्या कार्यकर्त्यांनी केलेले अथक परीश्रम आणि जनतेच्या भाजपाकडून असलेल्या अपेक्षांमुळे पक्षाची चांगली कामगिरी झाल्याचे मत त्यांनी नोंदविले.

Update : महापालिका आणि नगरपंचायत निवडणूक निकाल

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.