खासगी बसला टक्कर देण्यासाठी आता एसटी महामंडळाने कंबर कसली आहे. आंतरराज्य मार्गांवर सेमी स्लिपर बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळ आठवडाभरात पुणे-सुरत, पुणे-अहमदाबाद आणि नागपूर-हैदराबाद या आंतरराज्य मार्गांवर नवीन सेमी स्लिपर बससेवा सुरू करणार आहे.
अनेक ठिकाणी नव्या आंतरराज्य आणि जिल्हा मार्गांवर एसटीने वातानुकूलित; तसेच निमआराम बससेवा सुरू केली आहे. पुणे-नागपूर वातानुकूलित बससेवा नुकतीच सुरू केली. या सेवेला चांगला प्रतिसाद लाभला आहे. एसटीची घोडदौड वाढविण्यासाठी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांनी लक्ष केंद्रित केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून येत्या आठवडाभरात पुणे-सुरत, पुणे-अहमदाबाद, नागपूर-हैदराबाद या मार्गांवर सेमी स्लिपर बस सुरू करण्यात येणार आहे.