www.24taas.com, मुंबई
ख्वाजा युनुसच्या आईला २० लाख रूपयांची भरपाई देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं राज्यसरकाला दिले आहेत. ख्वाजाच्या आईनं दाखल केलेल्या याचिकेवर निकाल देताना न्यायालयानं हा आदेश दिलाय. पोटा कायद्यांतर्गत अटकेत असलेल्या ख्वाजाचा तुरूंगात मृत्यू झाला होता. खालच्या न्यायालयानं याआधी ३ लाख रूपये भरपाई देण्याचे आदेश दिले होते, मात्र उच्च न्यायालयानं भरपाईची रक्कम २० लाख रूपयांपर्यत वाढवून दिली आहे. दहा पोलिस अधिकाऱ्य़ांवर कारवाई करण्यासंबंधीची ख्वाजाच्या आईची विनंती मात्र न्यायालयानं फेटाळून लावली आहे.
सैयद ख्वाजा युनूस सैयद अयूब ऊर्फ ख्वाजा युनूस हा घाटकोपर बेस्ट बसमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाशी संबंधित आरोपी होता. २७ वर्षांचा ख्वाजा युनूस हा पळून गेलेला नसून पोलिसांनी कोठडीत केलेल्या मारहाणीमुळे त्याचा मृत्यू झाला असावा हे सरकारनेही मान्य केले आहे. घाटकोपर क्राईम ब्रँचच्या पोलिसांनी केलेल्या मारहाणीतच त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या मृतदेहाची कुणाच्याही नकळत विल्हेवाट लावली, असं सरकारने मान्य केलंय आणि तसा खटलाही संबंधित पोलिसांवर सरकारने दाखल केला आहे. असल्याने पोलिसांच्या या दुष्कृत्याबद्दल राज्य सरकारने ख्वाजा युनूसची आई आसिया हिला २० लाख रुपये भरपाई द्यावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने आज दिला.
दुबईत इंजिनियर म्हणून नोकरी करणाऱ्या ख्वाजा यूनूसला ३९ हजार रुपये पगार मिळत होता. तो आज जिवंत असता, तर वयाच्या ६०व्या वर्षापर्यंत नोकरी करून किमान १० कोटी रुपये कमावून घरच्यांना दिले असते, असा विचार करून त्याच्या मृत्यूस जबाबदार असणार्यांकडून याहून जास्त भरपाई हवी असल्यास त्यासाठी वेगळा दावा दाखल करण्याची मुभा कोर्टाने ख्वाजाच्या आईला दिली आहे.
[jwplayer mediaid="81094"]