www.24taas.com, मुंबई
मुंबईतील अधिकृत पीयुसी केंद्रांचा अनधिकृतपणा उघडकीस आला आहे. या पीयुसी केंद्रांनीच परिवहन विभागाला गंडा घालत मुंबईकरांच्या जीवाशी खेळायला सुरवात केली आहे. वाहनांची कुठलीही तपासणी न करता सरळ वाहन प्रदुषण विरहीत असल्याचं प्रमाण पत्र देणाऱ्या या पीयुसी केंद्रावर अंधेरी आरटीओनं कारवाईचा बडगा उचलला आहे.
मुंबईत वाढत्या लोकसंख्येबरोबरच दररोज शेकडो वाहनांची भर पडत आहे. वाढत्या वाहनांमुळे प्रदुषणाची समस्या मुंबईपुढे आ वासून उभी राहीली आहे. वाहनांमुळे होणारं प्रदुषण कमी करण्यासाठी परिवहन विभागतर्फे पीयुसी चाचणी केली जाते. पीयुसी चाचणीसाठी आरटीओची काही अधिकृत केंद्र आहेत. मात्र धक्कादायक माहीती अशी की अधिकृत केंद्रांनीच परिवहन विभागाला गंडा घालत मुंबईकरांच्या जिवाशी खेळायला सुरवात केली आहे. पीयुसीची ही अधिकृत केंद्र वाहनाची कुठलीही तपासणी न करता सरळ वाहन प्रदुषण विरहीत असल्याचं प्रमाण पत्र देतात. ही गोष्ट परिवहन विभागाच्या लक्षात येताच त्यांनी मुंबईकरांच्या जीवाशी खेळणाऱ्या पीयुसी केंद्रांवर धाड टाकली.
अंधेरी परिवहन विभागानं पश्चिम उपनगारातील १८ पीयुसी केंद्रैंवर लक्ष ठेवलं. बनावट ग्राहक बनून या पीयुसी केंद्रावर जाउन मुंबईकारंच्या जीवाशी खेळ करणाऱ्या १२ पीयुसी केंद्र चालकांना रंगेहात पकडलं. या केंद्रातच परवाना आणि पीयुसी करण्याची यंत्रणा जप्त केली.
यापुर्वी अंधेरी परीवहन विभागानं रिक्षाचालकांच्या मुजोरी विरोधात धडक मोहीम उघडली होती. आता मुंबईकरांच्या जीवाशी खेळणाऱ्या अधिकृत पीयुसी केंद्रांवर कारवाईचा बडगा उचलला. त्यामुळे अशाच पद्धतीच्या कारवाईत सातत्य ठेवलं तर लोकांच्या फायद्यासोबतच गैरप्रकारांनाही आळा बसेल.