www.24taas.com, मुंबई
तब्येत सुधारेपर्यंत उद्धव सोबतच राहणार असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितले आहे. तसेच शुक्रवारी होणाऱ्या अँजिओप्लास्टीच्या वेळी उद्धवसोबत राहणार असल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.
शिवसेना कार्याध्य़क्ष उद्धव ठाकरे यांच्यावर शुक्रवारी अँजिओप्लास्टी होण्याची शक्यता आहे. बायपास न करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. अँजिओप्लास्टीवेळी सर्व ठाकरे कुटुंबीयांनी उपस्थित रहावे, अशी शिवसेनाप्रमुखांची इच्छा आहे.
त्यामुळे राज ठाकरेही यावेळी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. शिवसेनाप्रमुख याबाबत राज ठाकरेंना फोन करण्याचीही शक्यता आहे.
उद्धव ठाकरे यांच्या छातीत दुखू लागल्यानंतर त्यांना सोमवारी सकाळी वांद्रयाच्या लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही बातमी वेगाने राजकीय वर्तुळात पसरली. राज ठाकरे यांना हे कळताच त्यांनी आपला नियोजित अलिबाग दौऱा रद्द करून अर्ध्या रस्त्यातून लीलावती रुग्णालयात दाखल झाले. लीलावतीमध्ये पोचण्यापूर्वीच त्यांनी तेथील डॉक्टरांना फोन करून उद्धव यांच्या तब्येतीबद्दल चौकशी केली होती.