www.24taas.com, झी मीडिया, नागपूर
विदर्भात पावसानं धुमाकूळ घातलाय. पूरस्थितीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विदर्भ दौरा केला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पूरग्रस्तांसाठी सर्वोतोपरी मदतीचं आश्वासन दिलं. शिवाय मृतांच्या नातेवाईकांसाठी अडीच लाख रुपये मदतीची घोषणा केली.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या पूरग्रस्त विदर्भ दौऱ्याची सुरुवात अमरावती आणि वाशिमपासून झाली. दोन्ही ठिकाणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी पूर परिस्थिती आणि शेतीच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला. अमरावती आणि वाशिमचा दौरा आटोपून हा ताफा पुढं चंद्रपुरात दाखल झाला. मात्र, विमानतळावर केवळ काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना प्रवेश दिल्यानं स्थानिक भाजप आमदार नाना शामकुळे यांनी नाराजी व्यक्त केली. चंद्रपूरच्या पूरस्थितीच्या पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी याबाबत चिंता व्यक्त केली. पूरात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांसाठी यावेळी त्यांनी अडीच लाख रुपये मदतीची घोषणा त्यांनी केली.
विदर्भातल्या पुरात पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. याचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी नागपुरात बैठकीचं आयोजन केलं. यावेळी ओला दुष्काळ जाहीर करा अशा घोषणांसह मुख्यमंत्र्यांचं स्वागत करण्यात आलं. दरम्यान, आढावा बैठकीला विरोधकांना बोलावलंच नसल्याचा आरोप भाजपचे आमदार नाना पाटोळे यांनी केलाय.
पूरग्रस्तांना देण्यात येणाऱ्या मदतीबाबत सोमवारी विधिमंडळ अधिवेशनात घोषणा करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. अतिवृष्टीमुळं यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यालाही मोठा फटका बसलाय. मात्र, या भागाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी भेट न दिल्यानं इथल्या शेतकऱ्यांची मोठी निराशा झालीय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.