www.24taas.com, झी मीडिया, नागपूर
राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सोमवारपासून नागपूर इथं सुरू होतंय. या अधिवेशनात जादुटोणाविरोधी विधेयक संमत करण्याचा चंग सरकारनं बांधलाय. त्याचबरोबर आदर्श अहवाल, वीज आणि सिंचन घोटाळा, राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था या मुद्यांवर विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता आहे. आठ तारखेला पाच राज्यांच्या निवडणुकीचा निकाल असल्यामुळं नऊ तारखेपासून सुरू होणाऱ्या या अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यावर निवडणुकीचे सावट असणार आहे.
नागपूरच्या गुलाबी थंडीत सोमवारपासून राज्य विधिमंडळाचं अधिवेशन रंगणार आहे. थंडीच्या माहोलात विधिमंडळात मात्र विविध विषयांवर गरमागरम चर्चा रंगणार आहे. मागील अनेक वर्ष प्रलंबित असलेलं जादुटोणा विरोधी विधेयक या अधिवेशनात संमत करण्याची पूर्ण तयारी राज्य सरकारने केलीय. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर सरकार या विधेयकाविषयी खडबडून जागं झालंय. स्वतः मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हे विधेयक समंत करणारच अशी ग्वाही दिलीय.
देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल रविवारी जाहीर होतोय. त्यामुळं सोमवारपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनावर या निकालांचं सावट निश्चित असणार आहे. तरीही दोन आठवडे असणाऱ्या या अधिवेशनात जनतेचे जास्तीत जास्त प्रश्न मार्गी लावण्याचा विरोधकांचा प्रयत्न असणार आहे. सरकारला घेरण्यासाठी
- दाभोळकरांच्या मारेकऱ्यांना पकडण्यात सरकारला आलेलं अपयश
- आदर्श अहवाल मांडण्यापासून सरकार काढत असलेला पळ
- विदर्भातील ओळा दुष्काळ
- सिंचन घोटाळा
- वीज घोटाळा
अशा विविध विषयांवर सरकारला घेरण्याची तयारी विरोधकांनी केली आहे. विरोधक विविध मुद्यांवर सरकारला घेरणार असले तरी जादुटोणा विरोधी विधेयक संमत करण्यास ते सरकारला पाठिंबा देणार आहेत. दोन आठवडे चालणाऱ्या हिवाळी अधिवेशनात विरोधक मांडणार असलेल्या मुद्यांना उत्तर देण्याची तयारीही सरकारने केली आहे. विदर्भात होणाऱ्या या अधिवेशनात विदर्भातील जनतेच्या पदरात काय पडते हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधारी आणि विरोधकांच्या चहापानाची परंपरा आहे. विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्यासाठी चहापानावर बहिष्कार टाकतात. मात्र यंदाच्या अधिवेशानाच्या पूर्वसंध्येला होणारा चहापानाचा कार्यक्रम रद्द करण्यात आलाय. दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्रपती नेल्सन मंडेला यांच्या निधनामुळं हा निर्णय घेण्यात आलाय. मंडेलांच्या निधनामुळं केंद्र सरकारनं ५ दिवसाचा दुखवटा जाहीर केलाय. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनंही अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला होणारं चहापान रद्द केलंय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.