www.24taas.com, परभणी
मराठा आरक्षणाला विरोध केल्यानं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं परभणीत पुतळा दहन करण्यात आलं. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनं करत राज्यात यापुढे राज ठाकरेंची सभा होऊ देणार नसल्याचा इशारा दिलीय.
‘निवडणुकीमध्ये मत मिळवण्यासाठी राज्यकर्त्यांकडे असणारं हत्यार म्हणजे आरक्षण... मतांसाठी जाती जातींमध्ये तेढ निर्माण करून मराठी माणसाला एकमेकांची माथी फोडायला लावतात. महाराष्ट्रातील संपूर्ण जनतेने मराठी म्हणून एकत्र येऊ नये, यासाठीच आरक्षणाच्या रूपाने जातीयवाद केला जात’ असल्याचं राज ठाकरे यांनी जळगावात म्हटलं होतं.
राज ठाकरे यांच्या या वक्तव्यावर जोरदार आक्षेप घेत संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. शहरातील शिवाजी महाराज पुतळ्यासमोर हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी मोठ्या संख्येनं संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या राज ठाकरेंच्या सभा यापुढे उधळून लावल्या जातील, असं संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी म्हटलंय.