www.24taas.com, झी मीडिया, नागपूर
टोलनाक्यांमुळे राज्यभरात डोकेदुखी वाढली असताना आता, टोलचा फटका एसटी महामंडळाच्या नागपूर विभागालाही बसलाय. गेल्या तीन वर्षांपासून नागपूर विभाग तोट्यात आहे. तोट्याच्या रकमेपैकी जवळपास एक तृतियांश रक्कम निव्वळ टोलसाठी खर्च होत असल्यानं एसटीचं चाक आणखी गाळात रूततंय.
टोल नाक्याच्या विषयावरून काही दिवसांपूर्वी राज्यभरात वादंग माजला होता. मनसेने या मुद्यावरून आंदोलन केल्यानं हा विषय आणखीच तापला. टोलवरून राजकारण रंगलं असताना, एसटीसारख्या शासकीय उपक्रमाला देखील टोलचा कसा फटका बसतो, त्याचं उदाहरण समोर आलंय.
गेल्या आर्थिक वर्षात एसटी महामंडळाला टोलच्या रूपाने ११० कोटी रुपयांचा भुर्दंड सोसावा लागला. नागपूर विभागाचा विचार केला तर मागील आर्थिक वर्षात १७ कोटी ७२ लाख रूपयांचा तोटा झाला. याकाळात नागपूर एसटी विभागाने ६ कोटी ११ लाख ९० हजार रुपये टोलरूपाने भरले. याचाच अर्थ एसटीच्या तोट्यामध्ये टोलचा वाटा हा एक तृतियांश इतका होता.
बाईट - राजीव घाटोळे, नागपूर विभागीय नियंत्रक, एसटी
572 एसटी गाड्यांमधून प्रवास करणारांची संख्या 1 लाखाच्या आसपास आहे. इथली चालक-वाहकांची संख्या 1100 इतकी आहे. गेल्या वर्षात एसटीला 15 कोटी 25 लाख 66 हजार 400 रूपयांचे उत्पन्न मिळाले. तर संचित तोटा 17 कोटी 72 लाखांवर गेला. नागपूर विभागाची ज्या मार्गावर एसटी सेवा आहे, अशा मार्गांवर एकूण ४१ टोल नाके आहेत.
एवढ्या मोठ्या संख्येने असलेल्या टोल नाक्यांमुळे एसटीचा तोटा वाढत चाललाय. सरकारने याबाबत मध्यस्थी करण्याची मागणी एसटीच्या अधिका-यांनी केली होती. टोलवसुली अशीच सुरूच राहिली तर एसटी बंद पडेल का, अशी शंका नागपूरकरांना आहे.
एसटी महामंडळ आणि टोल नाक्याचे कंत्राट देणारी यंत्रणा या दोन्ही संस्था शासकीय असल्या तरीही एक यंत्रणा दुसरीच्या मुळावर येतेय... टोलमुळे एसटीची हानी होत असल्यानं त्याचा फटका शेवटी जनसामान्यांनाच बसतोय...
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.