www.24taas.com झी मीडिया, नाशिक
सामाजिक संस्थेच्या एकत्रित पाठपुराव्यामुळे आणि पोलिसांच्या तपासामुळे 'ह्युमन ट्रॅफिकिंग'चा एक अमानुष प्रकार उघडकीस आलाय. पर्यटनाच्या नावाखाली बंगळूरुला नेलेल्या चौदा वर्षीय मुलीला दोन वर्ष तेथेच डांबून ठेवलं गेलं होतं. या मुलीकडून घरकामे करून घेण्यात आली. पोलिसांनी तिचा शोध घेऊन तिच्या कुटुंबीयांकडे सुखरुप पोहचवलं आहे.
संबंधित मुलीचे कुटुंब पंचवटी इथं राहते. कुटुंबाची परिस्थिती बेताची असून मुलीचे वडील हमाली करत होते. पण सध्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते काम करू शकत नाहीत. मुलीची आई घरकामे करून घर चालवत आहे. दोन वर्षापूर्वी अंजूम सय्यद या महिलेची या कुटुंबीयांशी ओळख झाली होती. त्यानंतर ती महिला बंगळूरला जात होती आणि तिच्यासोबत त्या मुलीला फिरायला घेऊन जाणार असल्याचं सांगून ती मुलीला आपल्यासोबत घेऊन गेली. रोजच्या कामातून ओळख झाल्याने विश्वासाने कुटुंबीयांनी आपल्या मुलीला त्या महिलेसोबत पाठवले.
बंगळूरला गेल्यानंतर अंजूम मुलीला नाशिकला पाठवण्याची टाळाटाळ करू लागली. हालाखीची परस्थिती असल्यामुळे तिच्या कुटुबांतील कोणतीही व्यक्ती बंगळूरला जाऊ शकत नव्हती. ही गोष्ट लक्षात आल्यावर अंजूमचा रोख आणखीन वाढला. ती महिला कुटुंबीयांना दमदाटी करू लागली. 'काय करायचे ते करून घे...माझ्या खूप ओळखी आहेत` अशी धमकी ती कुटुंबीयांना देऊ लागली. घाबरलेल्या आईने पंचवटीतील जाणीव कुटुंब सल्ला साहाय्य केंद्राच्या नीता कोठेकर यांच्याकडे मदत मागितली.
सौ. कोठेकर पोलीस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांना भेटल्या आणि त्यांच्या मदतीने थेट बंगळूर गाठले. त्यावेळेस अंजूम ही जवळच्या खेड्यात राहत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी खूप मेहनत घेतली पण तिचे घर शोधून काढले आणि त्या अंजूमला आपल्या ताब्यात घेतले.
अंजूमने या मुलीला घरात डांबून ठेवले होते. तिच्याकडून सर्व घरकामं करून घेतली. तिला कधी पैसे दाखवले नाही, जगाशी तिचा संबंध येऊ दिला नाही. चार भिंतींच्या आत राहून घरकाम करणं एव्हढंच या चिमुकलीच्या नशिबी आलं होतं. अंजूमच्या भीषण वर्तणुकीचा या मुलीच्या भाषेवरही दुष्परिणाम झाला. मूळ भाषा मराठी असली तरी ती मुलगी आता कन्नडमिश्रीत हिंदी अशी भाषा बोलू लागली आहे.
संबंधित मुलीची सुटका करण्यात आली असून पोलिसांनी तिला तिच्या कुटुंबाच्या स्वाधीन केले आहे. दोन वर्षांच्या वनवासानंतर ही मुलगी तिच्या आईच्या कुशीत विसावली तेव्हा दोघींनीही अश्रूंना वाट मोकळी करून दिली. माय-लेकींच्या भेटीने सगळेच आनंदले. पोलीस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांनी स्वतः हे प्रकरण हाताळत या माय-लेकींची भेट घडवली.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.