www.24taas.com, झी मीडिया, नाशिक
नाशिक शहरात सध्या कायद्याचं राज्य आहे की गावगुंडांचं असा प्रश्न नाशिककरांना पडलाय. कारण गेल्या पंधरा दिवसात नाशिकमध्ये एक दोन नाही तर तब्बल सात खुनाच्या घटना घडल्या आहेत. गुन्हेगारीला आटोक्यात आणण्यात पोलीस कमी पडत असल्याची टीका खुद्द काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेतेच करू लागले आहेत.
गुन्हेगारीनं बदनाम झालेल्या नाशिकला दोन वर्षांपूर्वी कुलवंतकुमार सारंगल यांच्या रुपानं ‘चांगला’ पोलीस अधिकारी मिळाला. आणि नाशिकमधल्या गुन्हेगारीवर ब-यापैकी वचक बसला. पण गेल्या पंधरा दिवसात नाशिकच्या गुन्हेगारीनं पुन्हा डोकं वर काढलंय. डीजे पुरवायला नकार दिला म्हणून २ मेला ध्वनिक्षेपकाचा व्यवसाय असणा-या प्रवीण दातेवर टोळक्याने सशस्त्र हल्ला केला, त्यात त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ७ मे रोजी मोहन चांगेल आणि दीपक सोनवणे या दुहेरी हत्याकांडानं पुन्हा एकदा शहर हादरंल. पाठोपाठ शिवाजीनगरमध्ये मित्रावर होणारा हल्ला रोखणा-या निरंजन साळुंखेवर एका टोळक्यानं हल्ला केला. भद्रकाली परिसरात शे सव्वाशे रुपयाच्या कारणावरून जुनेद शेख टोळक्याच्या हल्ल्याचा बळी ठरला. बहिणीशी अश्लील वर्तन केल्यानं मयूर मोरे यानं त्याच्या वडिलांचाच खून केला. पंचवटी परिसरात भावाच्या लग्नाच्या लगबगीत असणा-या अनिल धोत्रेवरही एका टोळीनं हल्ला केला. या सगळ्या घटना केवळ पंधरा दिवसांतल्या. असं असतानाही पोलीस प्रशासन मात्र कामगिरीवर समाधानी आहे.
दुहेरी खुनाच्या गुन्ह्यात महापौरांच्या मोठ्या भावाला पोलीस कोठडी सुनावण्यात आल्यानं काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं त्याचं भांडवल करण्याचा प्रयत्न केला. जानेवारीपासून आतापर्यंत पाच महिन्यात १६ खुनाच्या, १० बलात्काराच्या तर शंभरच्या आसपास चोरीच्या घटना घडल्यात. या घटनांनी नाशिककर पुरते भेदरलेत. त्यांना दिलासा देणं पोलिसांच्याच हातात आहे.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.