www.24taas.com, नाशिक
सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊतला अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानं नाशिक जिल्ह्यातल्या खेळाडूंच्या उत्साहाला उधाण आलंय. कवितानं घेतलेल्या मेहनतीला सोयी सुविधांची जोड मिळाली असती तर ती ऑलिम्पिकसाठीही पात्र होऊ शकली असती. अशा अनेक कविता नाशिक जिल्ह्यातल्या आदिवासी भागात आहेत. पण सुविधा नसल्यानं अशा अनेक सावरपाडा एक्सप्रेस रखडल्यात.
भर पावसात डांबरी रस्त्यावर धावणाऱ्या नाशिकमधल्या मुली तयारी करतायत स्पर्धेची... कवितानं असंच दिवस रात्र एक करत यश मिळवलं. ‘स्पोर्ट्स एथॉरिटी ऑफ इंडिया’नं इथं प्रशिक्षक दिलेला असला तरी आवश्यक पायाभूत सुविधा मात्र दिलेल्या नाहीत. प्रशिक्षणार्थी खेळाडूंना राहण्यासाठी हॉस्टेल नाही, धावपटूंसाठी सिंथेटिक ट्रॅक नाही.
आदिवासी विकास विभागानंही सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी वर्षभरापूर्वी घोषणा केल्या. पण अजून त्या बासनातच आहेत, अशी खंत कविताचे केंद्रीय कोच वीरेंद्र सिंग यांनी व्यक्त केलीय.
कबड्डी, मैदानी खेळांसाठी नाशिक जिल्ह्यातलं हवामान पोषक आहे. क्रीडाक्षेत्रात देशाचं नाव उंचावू शकतील अशी अनेक मुलं-मुली नाशिक जिल्ह्यात आहेत. अशा अनेक सावरपाडा एक्सप्रेस घडवण्यासाठी गरज आहे ती सोयी सुविधांची आणि खंबीर पाठिंब्याची.