www.24taas.com, मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक
नाशिकच्या खड्ड्यांवरून राजकारण पुन्हा एकदा झोकात सुरु झालंय. कालपर्यंत खड्डे बुजत नाहीत म्हणून बोटं मोडणारी मनसे आता खड्डे बुजविले जातायेत म्हणून आपल्याच अधिका-यांविरोधात शंका उपस्थित करतेय. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या दौ-यामुळे नाशिकचे रस्ते बुजविले जात असल्याचा मनसेचा आरोप आहे. मुख्यमंत्र्यांनी नाशिकमध्ये १५ दिवस मुक्काम ठोकावा म्हणजे सर्व रस्ते खड्डेमुक्त होतील असा उपरोधिक टोला मनसे लगावतेय.
नाशिकचे खड्डयांवरुन खडाजंगी सुरु आहे. सहाजिकच त्याला मुख्य कारण ठरलय ते राजकारण.. या राजकारणाला सुरवात झाली ती दुसर तीसर कोणी नाही तर नाशकात सत्ता गाजविणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वक्तव्याने. नाशिक मधील खड्ड्यांना मी जबाबदार नाही तर आधीचे सत्तधारी जबाबदार असल्याचा दावा राज साहेबांनी केला.
शिवसेनेसह कॉंग्रेस राष्ट्रवादीही तुटून पडले. त्यात योगायोग झाला तो पावसाची दोन दिवस उघडीप मिळण्याचा आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या नाशिक दौर्यायचा. या दोन नेत्यांच्या दौ-यामुळेच नाशिक शहरातील रस्त्यांवरचे खड्डे बुजविले जात असल्याचा आरोप खुद्द मनसेच्याच पदाधिकार-यांनी केलाय.
एकीकडे शहरातील रस्ते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या दौ-यामुळे खड्डेमुक्त होत असल्याचा आरोप मनसेचे पदाधिकारी करत आहे तर दुसरीकडे मंत्र्यांच्या दौ-याकडे अधिका-यांचं लक्षं असल्यानं आरोग्याच्या आणि इतर नागरी समस्यांकडे अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप प्रभाग सभापती करतायेत. मात्र कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी मनसेचा आरोप फेटाळून लावलाय.
तर दुसरीकडे सामान्य जनता ह्या राजकारणाला कंटाळली असून कोणाच्या तरी दौ-याच्या निम्मिताने का होईना पण नाशिकरांना खड्ड्यापासून थोडीफार तरी मुक्ती मिळाली असल्याचं समाधान मानतायेत.
गेल्या महिन्यात केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार नाशिक दौ-यावर आले होते. ते ज्या मार्गाने प्रवास करणार होते ते रस्तेही असेच चकाचक करण्यात आले होते. मात्र आता महिनाभरातच त्या रात्यांची चाळण झालीय. आताही मंत्र्यांच्या दौ-यांमुळे घाईघाईत रस्त्यावरील खड्डे बुजविले जातायेत. पण ते किती दिवस तग धरतील याचं छातीठोक उत्तर न ठेकेदार देतायेत ना अधिकारी.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.