www.24taas.com, झी मीडिया, नाशिक
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे नुकत्याच नाशिक दौऱ्यावर आल्या होत्या. दौऱ्यादरम्यान पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन राष्ट्रवादीच्या ‘ताईंनी’ चांगलीच झाडाझडती घेतली. त्यानंतर दोन दिवसातच राष्ट्रवादी युवक काँग्रेसची कार्यकारिणी बरखास्त करण्यात आल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही ‘रुटीन प्रोसेस’ असल्याचं सांगितलं जात असलं तरी भुजबळांच्या जिल्ह्यात ताईची झाडाझडती चर्चेचा विषय ठरलीय.
नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ रांचीमध्ये शक्तीप्रदर्शन करत असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे नाशकात ठाण मांडून होत्या. मात्र नेहमी युवती काँग्रेसच्या कार्यक्रमात दिलखुलास वावरणाऱ्या सुप्रियाताईंचा रुद्रावतार नाशिकच्या पदाधीकाऱ्यांनी बघितला. बैठकांचं नियोजन, शहर आणि जिल्ह्याचा अभ्यास आणि अनेक पदाधिका-यांनी बैठकीला दांडी मारल्यानं सुप्रिया सुळे बरसत होत्या. दौऱ्यानंतर दोन दिवसांत या रागाचं पर्यवसान बरखास्तीत झालं. सुप्रीयाताईंनी नाशिक शहर आणि जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसची ४० जणांची कार्यकारिणी बरखास्त केली. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निष्क्रीय पदाधीका-यांना हटवून तरुण आणि पक्षनिष्ठ पदाधिका-यांना संधी देण्यासाठी ही रूटीन प्रक्रीया असल्याचं पक्षातर्फे सांगण्यात येत आहे.
नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादीचं नव्हे तर भुजबळांच वर्चस्व आहे. त्यामुळं पक्षानं भुजबळांना नाशिक जिल्हा आंदण देवून टाकलाय. मध्यंतरीच्या काळात भुजबळांना पक्षांतर्गत विरोधही बराच झाला. मात्र भुजबळांना तोडीसतोड नेता नसल्यानं पालकमंत्र्यांच्या ‘बळा’ समोर सगळेच फिके पडले. आता थेट सुप्रिया सुळे यांनीच कार्यकारिणीच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करत झाडाझडती घेतल्यानं त्यांचा रोख कळतनकळत पालकमंत्र्यांच्या दिशेनेच जात असल्याचं राजकीय विश्लेषक संगत आहेत.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केलेल्या कामचं ब्रँडिंग करण्यासाठी आणि मनसेला टक्कर देण्यासाठी भुजबळ समर्थक गेल्या काही दिवसात रान पेटविताना दिसत आहेत. मात्र सुप्रिया सुळे यांच्यासमोर त्यांना अपेक्षित असलेल्या नियोजनात आणि अभ्यासात शहर पदाधिकारी कमी पडले आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जुन्या नव्यांचा समेट घडवणारी एकसंघ राष्ट्रवादी काँग्रेस दिसण्यासाठी काय पावलं उचलली जातात, याकडे लक्ष लागलं आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.