मराठवाड्याला पाणी, नगर, नाशिक आक्रमक

मराठवाड्याला पाणी सोडण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे अहमदनगर आणि नाशिकमधील शेतकरी तसंच राजकीय नेते चांगलेच आक्रमक झालेत. हक्काच्या पाण्यासाठी आज त्यांनी रास्ता रोको आंदोलन केलंय.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Nov 27, 2012, 08:01 PM IST

www.24taas.com, प्रशांत शर्मा, शिर्डी
मराठवाड्याला पाणी सोडण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे अहमदनगर आणि नाशिकमधील शेतकरी तसंच राजकीय नेते चांगलेच आक्रमक झालेत. हक्काच्या पाण्यासाठी आज त्यांनी रास्ता रोको आंदोलन केलंय.

जायकवाडीला पाणी सोडण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतल्यानंतर अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातले शेतकरी आणि राजकीय नेते आक्रमक झालेत. राहुरीत मुळा नदीच्या पुलाजवळ सर्वपक्षीय नेत्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं. शेतक-यांनी मुळा प्रकल्पाच्या दोन्ही कालव्यांचे दरवाजे उघडून पाणी सोडलं.
मुळा आणि भंडारदरा धराणातून पाणी सोडताना नदी पात्रातल्या कोल्हापुरी बंधा-यांवर तीन फळ्या टाकून पाणी अडवण्यात यावं, भंडारदरा धरणाच्या उजव्या आणि मुळाच्या डाव्या कालव्यातून शेतीला तीन आवर्तनं पाणी द्यावं अशी मागणी आंदोलकांनी केलीये.
थेट जायकवाडीत पाणी सोडल्यास हजारो एकरांवरील पिकं धोक्यात येणारेए. तसंच परिसरातल्या शेतीला पाण्याचा एकही थेंब मिळणार नसल्याचं आंदोलकांनी म्हटलंय. मराठवाड्यात प्राबल्य वाढावं यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं जायकवाडीला पाणी सोडण्याचा निर्णय घेतला असल्याची टीका होतेय.
मात्र राज्य सरकारमधलेच सहभागी आमदार आता पाणी सोडण्यास विरोध करताएत. एकीकडे पाणीप्रश्न पेटला असताना नगरमधील मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, बाळासाहेब थोरात आणि बबनराव पाचपुते मात्र बोलायला तयार नाहीत. त्यामुळे हा प्रश्न आणखी चिघळण्याची शक्यता आहे...