www.24taas.com, पुणे
एखाद्या सरकारी विभागाच्या दुरवस्थेविषयी प्रसार माध्यमातून वृत्त प्रसिद्ध झालं. तर, कारभार सुधारण्याची आणि दोषींवर कारवाईची अपेक्षा असते. पुण्यात समाजकल्याण विभागाच्या कारभाराबाबत अगदी याच्या उलटा अनुभव येतोय. या विभागाच्या होस्टेलमध्ये विद्यार्थ्यांना मेस चालकाने मारहाण केली. त्या विरोधात विद्यार्थ्यांनी आवाज उठवला. याचा परिणाम म्हणून विद्यार्थ्यांचीच हॉस्टेलमधून हकाल पट्टी करण्यात आलीय.
१५ जुलै रोजी समाज कल्याण विभागाच्या हॉस्टेलबाहेर विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं होतं. मेस चालकानं अपंग विद्यार्थ्याला बेदम मारहाण केल्यानं हे आंदोलन करण्यात आलं होतं. हॉस्टेलच्या दुरवस्थेनं विद्यार्थ्यांच्या सहनशक्तीचा अंत झाला होता. त्यामुळे प्रसारमाध्यमांनीही या आंदोलनाची दाखल घेतली. मात्र, याचा परिणाम उलटाच झाला. समाज कल्याण विभागाने इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या अतुल टेळे या विद्यार्थ्याला बाहेरचा रस्ता दाखवलाय. अतुलनं प्रसारमाध्यमांना माहिती देऊन शासनाची प्रतिमा मलीन केली. असं कारण त्यासाठी देण्यात आलंय.
हा सर्व प्रकार घडलाय त्या ज्ञानेश्वर विद्यालयाच्या आवारातच राज्याच्या समाज कल्याण आयुक्तांचं कार्यालय आहे. आयुक्तांच्या कार्यालयामागेच असलेल्या हॉस्टेलची अशी अस्वस्था आहे. आपल्या पाठीमागेच काय सुरु आहे, याकडे आयुक्त लक्ष देतील अशी हॉस्टेलमधल्या सगळ्यांचीच आशा आहे.