www.24taas.com, झी मीडिया, पुणे
पुण्यात सोनसाखळी चोरांची दिवाळी पूर्वीच दिवाळी सुरु झालीय. अवघ्या दीड तासात ७ सोनसाखळ्या हिसकावण्याच्या घटना शहरात आज घडल्या आहेत. विशेष म्हणजे चोरट्यांनी धूम स्टाईल केलेल्या या पाचही चोऱ्या एकाच जोडीने केल्या असल्याचं बोललं जातंय.
सकाळी ७:४५- खडक
८:३२- सहकारनगर
८:४३- डेक्कन
९;००- स्वारगेट
९:१५- पुन्हा स्वारगेट
४ पोलिस ठाण्यांच्या हद्दीत ५ घटना…सकाळी पावणे आठ ते सव्वानऊ, अवघ्या दीड तासात पाच महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या हिसकावण्यात आल्या. सोनसाखळी चोर मोटारसायकल वरून येतात आणि गळ्यातील सोनसाखळी किंवा दागिना हिसकावून पसार होतात. सतत घडणाऱ्या या घटनांमुळे पुण्यातील पोलिस आहेत कुठे, असा प्रश्न नागरिक विचारताहेत.
शहरात ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त तसेच नाकाबंदी असताना या घटना घडल्या आहेत. आजच्या सर्व घटनांमधील आरोपी सारखेच असण्याची शक्यता आहे.
पुण्यामध्ये सप्टेंबर महिन्यात सोनसाखळी चोरीच्या ३९ तर ओक्टोंबर मध्ये ५४ अशा अवघ्या २ महिन्यात एकूण ९३ घटना घडल्या आहेत. त्यापैकी केवळ १० गुन्हे पोलिसांकडून उघडकीस आले आहेत. अशा परिस्थितीत सोनसाखळी चोरीच्या घटना थांबणार कधी असा प्रश्न पुणेकर विचारताहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.