तीन नेत्यांच्या वाढदिवसामुळे पिंपरीत फ्लेक्सचा महापूर

तीन मातब्बर नेत्यांच्या वाढदिवासामुळे पिंपरी चिंचवड शहरातलं राजकारण ढवळून निघालं. एकापाठोपाठ आलेल्या या वाढदिवसांनी शहरात सर्वत्र फ्लेक्सचा पूर आला होता. वर्तमानपत्रांची पानं जाहीरातींनी भरुन गेली होती. मात्र या वाढदिवसांनी सामन्य जनतेला काय मिळालं हा प्रश्न कायम आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Feb 17, 2013, 08:07 PM IST

www.24taas.com, पिंपरी-चिंचवड
तीन मातब्बर नेत्यांच्या वाढदिवासामुळे पिंपरी चिंचवड शहरातलं राजकारण ढवळून निघालं. एकापाठोपाठ आलेल्या या वाढदिवसांनी शहरात सर्वत्र फ्लेक्सचा पूर आला होता. वर्तमानपत्रांची पानं जाहीरातींनी भरुन गेली होती. मात्र या वाढदिवसांनी सामन्य जनतेला काय मिळालं हा प्रश्न कायम आहे.
फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच शहरांतील रस्ते अशा विविध फलकांनी भरुन गेले होते. शहरातले राष्ट्रवादी काँग्रेसचे मातब्बर नेते आझम पानसरे यांचा वाढदिवस 12 तारखेला झाला. निवडणूक लढवणार नाही असं आझमभाईंनी जाहीर केलंय. तरीही वाढदिवसाला शक्ती प्रदर्शन करण्याची संधी त्यांनी सोडली नाही. योगायोगानं मावळ लोकसभा मतदारसंघातील पानसरेंचे विरोधक लक्ष्मण जगताप यांचा वाढदिवस 15 तारखेला झाला. आणि लगेच दुस-या दिवशी 16 तारखेला याच मतदार संघातील शिवसेना नेते श्रीरंग बारणे यांचा वाढदिवस होता. त्यामुळे या संपूर्ण आठवड्यात शुभेच्छा फलकांनी शहरात गर्दी केली होती. या वाढदिवस सप्ताहामुळे आणि फ्लेक्स बाजीमुळे सामान्य जनतेत नाराजी आहे.

लग्न, वाढदिवस यासारख्या खासगी कार्यक्रमातून होणारी उधळपट्टी ही नेता होण्याचा पासवर्ड बनली आहे. सध्या राज्यात दुष्काळानं आपला इंगा दाखविण्यास सुरुवात केली आहे. तरीही या नेत्यांची मिरविण्याची हौस काही कमी होत नाही. प्रतिष्ठेसाठी उधळपट्टी करणारे हे नेत्यांनी मनासाठी नाही तर जनासाठी तरी शहाणे होणार हा प्रश्न कायम आहे.