कार्तिकी एकादशी : पंढरपुरात उत्साह, विरोधानंतर अजित पवारांचा दौरा रद्द

कार्तिकी एकादशी. "अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक, जाईन गे माय तया पंढरपुरा भेटीन माहेरा आपुलिया` अशी आस उराशी बाळगून कार्तिकी यात्रेच्या आनंद सोहळ्यात सहभागी होण्यासाठी सुमारे तीन लाख वारकरी पंढरपुरात दाखल झालेत. दरम्यान, वारकऱ्यांचा विरोधानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही कारणाने आपला दौरा रद्द केला.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Nov 13, 2013, 08:22 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, पंढरपूर
आज कार्तिकी एकादशी. "अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक, जाईन गे माय तया पंढरपुरा भेटीन माहेरा आपुलिया` अशी आस उराशी बाळगून कार्तिकी यात्रेच्या आनंद सोहळ्यात सहभागी होण्यासाठी सुमारे तीन लाख वारकरी पंढरपुरात दाखल झालेत. दरम्यान, वारकऱ्यांचा विरोधानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही कारणाने आपला दौरा रद्द केला.
टाळ, मृदंगाच्या ठेक्याहत सारी पंढरपूर नगरी तल्लीन झालीये. पालकमंत्री दिलीप सोपल यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय पूजा करण्यात आली दरम्यान यंदा विठ्ठल महापूजेचा मान हा सांगली जिल्ह्यातल्या मिरज तालुक्यातील एरंडेल गावच्या तुकाराम आणि जयश्री पाटील या दांपत्याला मिळालाय.. तुकाराम पाटील हे माजी सैनिक असून ते गेल्या सातवर्षांपासून पायी वारी करतात..
वारक-यांच्या तीव्रविरोधामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपला आजचा पंढरपूर दौरा रद्द केला. कार्तिकी एकादशीला अजित पवार यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा करण्यात येणार होती. मात्र, अजित पवारांनी दौरा रद्द केल्यानं आता विठ्ठलाची पुजा पालकमंत्री दिलीप सोपल यांच्या हस्ते करण्यात आली.
महाराष्ट्रात गोहत्या बंदी कायदा लागू न केल्यामुळे ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी आणि उजनी धरण आणि पर्यायाने पवित्र चंद्रभागेविषयी अपशब्द वापरल्याच्या कारणावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कार्तिकीची शासकीय महापूजा करू देणार नाही, असा इशारा दिला होता. त्या पार्श्व्भूमीवर उपमुख्यमंत्री पवार यांनी आज पंढरपूर दौरा रद्द केला.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.