मान्सून दोन दिवस आधीच अंदमानात दाखल

यंदा मान्सून दोन दिवस आधीच अंदमानात दाखल झालाय. मान्सून सामान्यत: 20 मे रोजी अंदमान समुद्रात दाखल होतो. मान्सून वेळेआधी दाखल झाला असला, तरी तो केरळात नेहमीपेक्षा चार दिवस उशिराने पोहेचेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: May 19, 2014, 10:48 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, पुणे
यंदा मान्सून दोन दिवस आधीच अंदमानात दाखल झालाय. मान्सून सामान्यत: 20 मे रोजी अंदमान समुद्रात दाखल होतो. मान्सून वेळेआधी दाखल झाला असला, तरी तो केरळात नेहमीपेक्षा चार दिवस उशिराने पोहेचेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
पावसाला घेऊन येणारे मोसमी वारे अंदमान समुद्र, अंदमान-निकोबार बेटे आणि बंगालच्या उपसागराच्या दक्षिण भागात दाखल झाले आहेत. दरम्यान महाराष्ट्रात काही ठिकाणी वादळी पावसाचे वातावरण असून पुणे, इचलकरंजी, सांगलीसह काही ठिकाणी काल वादळी पाऊस पडला. येत्या दोन दिवसात इतरत्र पाऊस पडण्याची शक्यता आहे.
अंदमान परिसरातील हवामान मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक असून, पुढील ४८ तासात तो संपूर्ण अंदमान आणि बंगालच्या खाडीचा बहुतांश भाग व्यापेल. मागील २४ तासांपासून अंदमानात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. पुढील दोन ते तीन दिवस तिथं दमदार पावसाची शक्यता आहे.
`अंदमान निकोबार परिसरात सर्वदूर पाऊस होत आहे. मान्सूनसाठी आवश्यक सर्व निकष तिथं आढळून आल्यानं तिथं मान्सूनचं आगमन झाल्याचं स्पष्ट होत आहे. केरळमध्ये 5 जूनपर्यंत मान्सून दाखल होईल, असा अंदाज आहे. परंतु, त्यात तीन चार दिवस पुढे मागे होऊ शकतील,` असे हवामान विभागाच्या उपमहासंचालक डॉ. मेधा खोले यांनी सांगितले.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.