`चिल्लर दारुपार्टी`वर कारवाई का नाही?

पुण्यात शनिवारी अल्पवयीन मुलांनी दारु पिऊन धिंगाणा घातला असतानाच रविवारी पुन्हा त्याच रिव्हर व्ह्यू रिसॉर्टवर दारु पार्टी रंगली. शनिवारी पोलीस कारवाई झाली असतानाही मुजोर मुलांनी पुन्हा रविवारी दारु पार्टी साजरी केली.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Aug 29, 2012, 03:03 PM IST

www.24taas.com, पुणे
पुण्यात शनिवारी अल्पवयीन मुलांनी दारु पिऊन धिंगाणा घातला असतानाच रविवारी पुन्हा त्याच रिव्हर व्ह्यू रिसॉर्टवर दारु पार्टी रंगली. शनिवारी पोलीस कारवाई झाली असतानाही मुजोर मुलांनी पुन्हा रविवारी दारु पार्टी साजरी केली. या पार्टीतही मुलंमुली दारुच्या नशेत धुंद होऊन धिंगाणा घालत होती. महत्त्वाचं म्हणजे सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या या पार्टीची माहिती पोलिसांना मिळू शकली नाही. किंबहुना ज्या ठिकाणी ही पार्टी झाली त्या ‘व्ह्यू रिसॉर्ट’च्या मालकांनी पोलिसांना त्याबद्दल कळवण्याची तसदी घेतली नाही.
कुणाचं आहे हे रिसॉर्ट
‘व्ह्यू रिसोर्ट’ उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चुलत बंधू जयंत पवार यांच्या मालकीचं असून त्यांनी ते भाडे तत्वावर दिल्याचं समजतयं. य़ा प्रकरणी पोलिसांनी पार्टी आयोजकांवर किरकोळ गुन्ह्यांची नोंद करून केवळ १२०० रूपये दंड आकारून त्याला सोडून देण्यात आलयं. पण हा सगळा प्रकार घडल्यानंतर पोलिसांनी आयोजकांवर किरकोळ गुन्हे का दाखल केले गेले? पोलिसांवर कुणाचा राजकिय दबाव होता का? २१ वर्षांखालील व्यक्तिला दारू पिण्याचा परवाना मिळत नसतानाही या अल्पवयीन मुलांनी दारू कशी काय देण्यात आली? असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थितं झाले आहेत.
पार्टीचं निमंत्रण सोशल वेबसाईटवरून
उल्लेखनीय बाब म्हणजे, या पार्टीचं निमंत्रण देण्यासाठी सोशल नेटवर्क साईटचा वापर करण्यात आल्याचं उघड झालंय. तसंच या पार्टीत सहभागी होणाऱ्या मुलींकडून कोणत्याच प्रकारची फी घेण्यात आली नव्हती. मात्र मुलांकडून ‘एन्ट्री फी’ घेतली गेली होती. मुलांना रिसॉट कडून फुकट दारु वाटण्यात आली होती. त्यामुळे पार्टीला आलेल्या मुलामुलींनी दारुवर एथेच्छ ताव मारला. केवळ आठवी आणि नववीत शिकणारी सुमारे सातशे मुलं-मुली या पार्टीत सहभागी झाले होते. ही मुलं दारुच्या नशेच धुंद झाली होती. दारु पिण्यासाठी जणू त्यांच्यात स्पर्धाच लागली होती. त्यांना कशाचचं भान नव्हतं. त्या मुला-मुलींनी ते हॉटेल अक्षरश: डोक्यावर घेतलं होतं. कोण काय करतंय याचं त्यांना जराही भान नव्हतं. काहींनी तर सगळ्या सीमा ओलांडल्या होत्या. दारुच्या नशेत मुलं अश्लील चाळे करु लागले होते. तिथली परिस्थिती पालक उघड्या डोळ्यांनी पहात होते. पण, मुलं काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. कारण दारुच्या नशेत ते बेभान झाले होते. मुलं कुणालाच जुमानत नसल्याचं पहाता अखेर पालकांनी पोलिसांना पाचारण केलं.