www.24taas.com, पुणे
पुण्यातल्या इस्माईल दाम्पत्याच्या घरात जणू काही कायमच पक्षी महोत्सव भरलेला दिसतो. साहिल इस्माईल यांना पक्षी जोपासण्याचा अनोखा छंद जडलाय. आजवर त्यांनी ४०० हून अधिक विविध जातीचे पक्षी जोपासलेत.
याच पक्ष्यांच्या चिवचिवाटानंचं पुण्याच्या इस्माईल दाम्पत्याचा दिवस उजाडतो आणि मावळतोही याच पक्ष्यांच्या सान्निध्यात... वडिलांकडून मिळालेला पक्षी जोपासण्याचा हा वारसा साहिल इस्माईल सांभाळत आहेत. त्यांच्या घरात २०० जातीचे ४०० हून अधिक रंगीबेरंगी पक्षी आहेत. विशेष म्हणजे या सर्व जाती दक्षिण आफ्रिका, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया या देशातल्या आहेत. भारतातही अनेक पक्षीप्रेमींकडून या पक्ष्यांना मागणी आहे. मात्र, पक्षी संगोपनाची माहिती नसल्याने बऱ्याचदा या पक्षांच्या आरोग्याला धोका निर्माण होतो. त्यामुळं विविध प्रदर्शनातून साहिल जनजागृती निर्माण करत आहेत.
साहिल यांना त्यांच्या या अनोख्या छंद जोपासण्यात मोलाची साथ मिळतेय ती त्यांच्या पत्नी झारा यांची... पक्षांच्या आहारापासून ते स्वच्छतेपर्यंतची सर्व जबाबदारी त्या चोखपणे पार पाडतात. पक्ष्यांना इजा झाल्यास वेळेत वैद्यकीय मदत न मिळाल्यानं त्यांचा जीव जातो. त्यामुळे झारा यांनी परदेशात जाऊन पक्ष्यांसाठी आवश्यक औषधांची माहिती मिळवलीय. पतीसोबत त्यांचंही या पक्ष्यांसोबत अतूट नातं निर्माण झालंय.
भारतात अशा परदेशी पक्ष्यांच्या आयातीवर बंदी आहे. मात्र, पक्षीप्रेमींकडून होणारी वाढती मागणी लक्षात घेऊन सरकारनं ही बंदी उठवण्याची मागणी इस्माईल दाम्पत्य करतंय. एकूणच इस्माईल दाम्पत्याचा हा पक्षीसंगोपनाचा छंद आगळावेगळा म्हणावा लागेल.