माजी सरपंचाच्या हत्येत सतेज पाटील अडकणार?

कोल्हापुरात बुधवारी दुपारी झालेल्या पाचगावचे माजी सरपंच अशोक पाटील यांच्या हत्येप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आलीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Feb 14, 2013, 11:34 AM IST

www.24taas.com, कोल्हापूर
कोल्हापुरात बुधवारी दुपारी झालेल्या पाचगावचे माजी सरपंच अशोक पाटील यांच्या हत्येप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आलीय. यानंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीत सतेज पाटील यांचं नाव पुढे आलंय त्यामुळे पाटील मात्र चांगलेच अडकलेत.
अटक झालेल्या चार जणांमध्ये गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांचा कट्टर कार्यकर्ता दिलीप जाधव याचाही समावेश आहे. त्यामुळे या हत्येमागे सतेज पाटील यांचा सहभाग आहे का? याविषयी चौकशी करण्यात यावी, अशी मागणी मृत अशोक पाटील यांच्या नातेवाईकांनी केलीय. नातेवाईकांनी अशोक पाटील यांचा मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला होता. संबंधित आरोपींवर गुन्हा दाखल केल्यानंतरच मृतदेह ताब्यात घेणार असल्याची भूमिका नातेवाईकांनी घेतलीय. कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनीही सीपीआर परिसराला भेट दिली होती. कोल्हापूर आणि पाचगावमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय.

पाचगावचे माजी सरपंच असलेले अशोक पाटील यांची कोल्हापुरात भरदिवसा गोळी घालून अज्ञात हल्लेखोरांनी बुधवारी हत्या केलीय. अशोक पाटील काँग्रेसचे आमदार महादेवराव महाडिक आणि धनंजय महाडिक याचा कट्टर कार्यकर्ता होता. गृहराज्यमंत्री सतेज पाटील आणि महाडिक यांच्या गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये पाचगावमध्ये यापूर्वीही अनेकवेळा ग्रामपंचायत निवडणुकीतून वाद झालेत.