दहा कोटींच्या एका लग्नाची गोष्ट, राष्ट्रवादीच्या नेत्यांची श्रीमंती

पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याने आपल्या पुतण्याचं आणि पुतणीचं शाही भाटामाटात लग्न लावलंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Feb 10, 2014, 06:53 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, इंदापूर, पुणे
पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याने आपल्या पुतण्याचं आणि पुतणीचं शाही थाटामाटात लग्न लावलंय. पक्षाध्यक्ष शरद पवारांच्या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता लावत, राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद अध्यक्ष दत्तात्रय भरणे यांनी `अंथुर्णे` इथं हा शाही लग्नसोहळा पार पाडला.
या लग्नासाठी राष्ट्रवादीच्या सर्वच ज्येष्ठ नेत्यांनी हजेरी लावली. यात उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांचाही समावेश होता. याशिवाय काँग्रेस आणि भाजपचे नेतेही उपस्थित होते. या शाही लग्नाला तब्बल १० कोटींच्या आसपास खर्च आल्याचं बोललं जातंय.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नेहमीच अशा शाही लग्नांना विरोध केलाय. मात्र, पवारांच्या विरोधाकडे दुर्लक्ष करण्याचं काम त्यांच्याच जिल्ह्यातल्या राष्ट्रवादीच्याच ज्येष्ठ नेत्याने केलंय. मंत्र्यांना बसण्यासाठी विशेष बैठक व्यवस्था, पाहुण्यांसाठी तब्बल ८० हजारांपेक्षा जास्त खुर्च्या, लाखो लीटर पाण्याच्या बाटल्या, लग्न लागल्यावर आकाशात फटाक्यांची आतिषबाजी, तोफांची सलामी, परिसरातल्या प्रत्येक घरात साडी चोळी, बांगड्या, साखर वाटप असा शाही थाटात या लग्नाचा बार उडाला.
नेत्यांच्या घरच्या लग्नासाठी शासकीय यंत्रणा वेठिला...
भरणे यांच्या या लग्न सोहळ्याच्या तयारीसाठी भरणे यांनी चक्क जलसंपदा खात्याची शासकीय यंत्रणाच वेठीला धरली. भरणे यांच्या पुतण्याचं लग्न ज्याठिकाणी पार पडलं, त्या इंदापूरच्या पालखी तळाच्या सपाटीकरणाच्या कामाचा धडाका जलसंपदा खात्याने लावला होता.
जलसंपदा खात्याचा पुणे यांत्रिकी विभाग क्रमांक-२ यासाठी कामाला लागला होता. पाटबंधारे विभागाच्या विश्रामगृहालाही रंगरंगोटी करण्यात आली होती. एरवी या परिसरात कधी वीज दिसत नाही. मात्र, लग्नासाठी खांबांवर उच्च दाबाचे विजेचे दिवे लागले. या सगळ्या लगीनघाईत फक्त जलसंपदा खातं नाही तर तालुक्यातल्या विकास सोसायट्यांच्या यंत्रणाही कामाला लागल्या होत्या.
शाही सोहळ्यासाठी पुणे जिल्ह्यातली संपूर्ण शासकीय यंत्रणाच महिनाभर राबत होती अशी चर्चा आहे. जलसंपदा खात्याच्या या उत्साहाबाबत अन्थुर्णे विभागाच्या शाखा अभियंत्यांना विचारणा केली असता त्यांनी विसंगत उत्तरं द्यायला सुरूवात केली.
कोण आहेत हे दत्तात्रय भरणे?
दत्तात्रय भरणे हे पुणे जिल्हा परिषदेचे विद्यमान अध्यक्ष आहेत. अजित पवारांचे निकटवर्तियांमध्ये त्यांचं नाव प्रामुख्यानं घेतलं जातं. गेल्या निवडणुकीत आघाडीत बिघाडी करत निवडणूक लढलेल्या भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांच्याविरोधात ही निवडणूक लढली होती.
तसंच, भरणे हे पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे विद्यमान संचालकही आहेत. छत्रपती सहकारी साखर कारखान्याचा अध्यक्ष म्हणून काही काळ ते पदावर होते. बारामती लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी भरणेंकडेच आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.