पवारांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार जाहीर करा - राष्ट्रवादी कार्यकर्ते

राज्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवरचा कार्यकर्त्यांचा विश्वास उडाला आहे. थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाच मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार जाहीर करण्याची मागणी पुण्यातल्या कार्यकर्त्यांनी केली आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jun 6, 2014, 07:52 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, पुणे
राज्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवरचा कार्यकर्त्यांचा विश्वास उडाला आहे. थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाच मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार जाहीर करण्याची मागणी पुण्यातल्या कार्यकर्त्यांनी केली आहे.
विधानसभा निवडणुक जसजशी जवळ येतेय, तसतशी सत्ताधारी पक्षांमधली अस्वस्थता वाढायला लागली आहे. काँग्रेसमध्ये प्रामुख्यानं मुख्यमंत्र्यांवर रोष आहे. निवडणुका जवळ आल्या तरी पक्षात असलेला धोरणलकवा अनेकांना मान्य नाही. दोन नव्या मंत्र्यांना अद्याप खातेवाटप झालेलं नाही, विधान परिषदेची नावं निश्चित नाहीत.अशा स्थितीत कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राज्यातल्या एकाही नेत्यावर कार्यकर्त्यांचा विश्वास उरलेला नाही, असंच दिसतंय.
पुणे जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांनी थेट शरद पवारांनाच मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार जाहीर करा, अशी मागणी त्यांनी केलीये. विधानसभा निवडणुकांसाठी शरद पवारांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार जाहीर करा, अशी मागणी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी केलीय. शरद पवार यांनी पुणे जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांची बैठक आज बोलावली होती. या बैठकीत हा नवा सूर उमटलाय.
लोकसभा निवडणुकीत धुव्वा उडाल्यानं कार्यकर्तेही हतबल झालेत. अशा परिस्थितीत मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून शरद पवारांच्या नावाची घोषणा केल्यास, राष्ट्रवादीला जास्त जागा मिळतील, अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे केवळ 4 खासदार विजयी झाले होते.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.