शरद पवारांचा कॅन्सरशी लढा...

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना कॅन्सर झाल्याचे निदान झाले आणि उपचार करणाऱ्या डॉक्टरने सांगितले, साहेब तुमचे सहाच महिने उरले आहेत. काही कागदपत्रे तयार करायची असतील तर करून घ्या, असा सल्ला दिला. मात्र मी खचलो नाही, निकराचा लढा दिला. मेडिकल ट्रीटमेंट यांच्या जोरावर आज मी `कॅन्सर` पासून पूर्णपणे मुक्त झालो आहे, असे केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी शनिवारी पुण्यात सांगितले.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Oct 21, 2012, 02:31 PM IST

www.24taas.com,पुणे
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना कॅन्सर झाल्याचे निदान झाले आणि उपचार करणाऱ्या डॉक्टरने सांगितले, साहेब तुमचे सहाच महिने उरले आहेत. काही कागदपत्रे तयार करायची असतील तर करून घ्या, असा सल्ला दिला. मात्र मी खचलो नाही, निकराचा लढा दिला. मेडिकल ट्रीटमेंट यांच्या जोरावर आज मी `कॅन्सर`पासून पूर्णपणे मुक्त झालो आहे, असे केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी शनिवारी पुण्यात सांगितले.
कॅन्सर झालेल्या गोष्टीला आता दहा वर्षे झाली आहेत. लोकसभेच्या निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जात असताना बरोबर असलेल्या डॉक्टर मित्राने मेडिकल तपासणी करून घेण्याचा सल्ला दिला. अर्ज भरल्यानंतर घरी न जाता गाडी थेट मुंबईतील ब्रिज कॅन्डी हॉस्पिटलमध्ये घेतली. आवश्यक ती तपासणी केल्यानंतर ५०-५० टक्के शक्यता वर्तविली. मी खचून न जाता पुढील उपचारासाठी परदेशात जाण्याचा निर्णय घेतला. ऑपरेशन करणारे तज्ज्ञ परदेशी डॉक्टर तेव्हा मुंबईतच होते. त्यामुळे अवघ्या तीन दिवसांतच कॅन्सरचे ऑपरेशन यशस्वी झाले. ऑपरेशननंतरची ट्रीटमेंट सुरूच होती.
सकाळी नऊ ते पाच मंत्रिपदाचे काम त्यानंतर हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार घेणे सुरू झाले. या उपचारांमध्ये जीभ, ओठ जळाले, तोंडातील दात गेले, प्रचंड त्रास झाला. मात्र, न घाबरता उपचार सुरूच ठेवले. सुरूवातीला आठवड्याने तपासणीसाठी जावे लागायचे पुढे पंधरा दिवस, महिना, तीन महिने, सहा महिने, एक वर्षे असे करत तीन वर्षे झाली त्यानंतर डॉक्टरांनी आता कधीही येऊ नका असे सांगत आजार बरा झाल्याचे सांगितले. त्यानंतर मला बरे बाटले.
आजारपणाच्या काळात पत्नी प्रतिभा आणि मुलगी सुप्रिया यांची मिळालेली भक्कम साथ, आजाराशी लढा सुरू असताना झालेल्या त्रास आणि मला बरे वाटावे यासाठी कार्यकर्त्यांची चाललेली धडपड यांच्या आठवणीही पवारांनी सांगितल्या.