www.24taas.com, झी मीडिया, सातारा
कर्मवीर भाऊराव पाटील रयत शिक्षण संस्थेत शरद पवारांची एकाधिकारशाही सुरु असल्याचा हल्लाबोल मॅनेजिंग काऊन्सिलचे माजी सदस्य प्रा. यू. जी.पाटील यांनी केलाय. पवारांची हुकूमशहा अशी संभावना त्यांनी केलीय. तसंच ‘रयत शिक्षण संस्थे’च्या आज होणाऱ्या निवडणुकीत पवारांनी स्वारस्य दाखवू नये, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केलीय.
बहुजन समाजापर्यंत ज्ञानगंगा पोहचावी यासाठी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. या संस्थेत लोकशाही पद्धतीने कामकाज सुरु होतं. मात्र, गेल्या २० वर्षांपासून रयत शिक्षण संस्थेमध्ये केंद्रीय कृषिमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची एकाधिकारशाही सुरू आहे. नरेंद्र मोदींच्या एकाधिकारशाही विरोधात खडे फोडणारे शरद पवार याठिकाणी स्वतःच हुकूमशहाप्रमाणे वागत आहेत, अशी घणाघाती टीका मॅनेजिंग काऊन्सिलचे माजी सदस्य प्रा. यू. जे. पाटील यांनी केलीय.
महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण आणि माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील दोन महान नेतेही रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष होते. त्यांनी कधीही आपला एकही नातेवाईक संस्थेत घेतला नसल्याचं यू. जी. पाटील यांनी म्हटलंय. मात्र, पवारांनी रयत शिक्षण संस्थेत घराणेशाही राबवत सुप्रिया सुळे यांना जनरल बॉडी सदस्य करुन घेतल्याची पुस्ती त्यांनी जोडलीय.
रयत शिक्षण संस्थेमधील भ्रष्टाचारावरही त्यांनी हल्लाबोल केलाय. याला शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेकाप जबाबदार असल्याची टीका त्यांनी केलीय. त्यामुळं आता यशवंतरावाचे मानसपुत्र म्हणवणाऱ्या पवारांनी त्यांचे आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांचे विचार रयत शिक्षण संस्थेत रुजवावे अशी मागणी होतेय. शिवाय डोंगर-दऱ्यांत काम करणाऱ्या कर्मवीर सेवकाला रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्षपद देण्याची धमक दाखवावी, असा सूर उमटतोय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.